प्रभातकुमार शर्मा : कर्मठ संघसमर्पित व्यक्तिमत्त्व

    03-Feb-2024
Total Views |
 Prabhatkumar Sharma Died

रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक प्रभातकुमार शर्मा यांचे नुकतेच निधन झाले. नाशिक महापालिका शहर संघरचना अस्तित्वात येण्यापूर्वी ते नाशिकरोड शहर कार्यवाह म्हणून कार्यरत होते. महापालिका रचना झाल्यावर, ते नाशिकरोड नगर कार्यवाह होते. ८०-९०च्या दशकात त्यांनी नाशिकरोड परिसरात संघकार्य विस्ताराचे मोठे कार्य केले. पुढे ते नाशिक येथील कंपनीतून अधिकारी पदावरून निवृत्त झाल्यानंतर, पुण्यात स्थायिक झाले. नाशिकरोड परिसरात नवीन वसाहती वाढत असताना, संघकामाचा विस्तार करण्यात, ज्या कार्यकर्त्यांनी कष्ट उपसले, त्यापैकी एक म्हणजे प्रभातकुमार शर्मा! प्रभातकुमार शर्मा हे आग्रही, प्रसंगी कठोर, पण मनातून क्षमाशील आणि कर्मठ संघसमर्पित व्यक्तिमत्त्व असल्याची भावना नाशिकमधील सुहृद्यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे उपसंपादक पवन बोरस्ते यांच्याशी बोलताना व्यक्त केली.


त्यांच्या रागावण्याचे कधीही वाईट वाटले नाही!

प्रचारक म्हणून काम थांबविल्यानंतर मी नाशिकरोडलाच स्थायिक झालो. प्रभातकुमार शर्मा ज्या ठिकाणी राहात होते, त्याच जेलरोड येथील इंगळेनगर भागात मी राहत होतो. एकदा गिरीश कुबेर यांनी त्यांच्याशी माझा परिचय करून दिला. त्यानंतर शर्माजींच्या इंगळेनगर शाखेत मी जाऊ लागलो. शाखेसंदर्भात त्यांचा प्रचंड आग्रह असायचा. शाखेत न गेल्यास, ते स्वतः सकाळी शाखा सुटल्यावर घरी येत असत. ‘सुहासजी आप क्यो नही आये, ऐसा नही चलेगा’ अशा शब्दांत रागवत असे. त्यांच्या रागावण्याचे कधीही वाईट वाटले नाही; कारण त्यामागे त्यांचे प्रेम असायचे. समाजात जाऊन वेगवेगळी आणि सर्व स्तरातील माणसं त्यांनी जोडली आणि शाखेत आणली. त्यामुळे नाशिकरोडमध्ये संघाचं मोठं काम उभं राहिलं. संचलनात प्रत्येकाचा गणेवश पूर्ण कसा असेल, यासाठी ते विजयादशमीच्या दोन महिने आधीपासूनच तयारी सुरू करायचे. प्रत्येकाकडे जाऊन, त्याला काय कमी आहे, याची विचारपूस करत. संघाशी निष्ठा असणारे आणि संघ स्वयंसेवकांना त्या-त्या स्तरावर, त्या-त्या नात्यामध्ये प्रेम ते द्यायचे. त्यांच्या पत्नी अर्थात पूनमभाभी आदारातिथ्य केल्याशिवाय जाऊ देत नसे. आठवणी तर खूप दाटून येतात. हनुमान जयंतीला अकरा हनुमान मंदिरात जाऊन ते दर्शन घ्यायचे. घराघरामध्ये त्यांचा संपर्क होता. शाखेत येणार्‍याची सगळ्या प्रकारे उन्नती कशी होईल, यासाठी ते आग्रही असायचे.
- सुहास पाठक

आठवणींवर बोलायला गेलं, तर एखादं पुस्तक तयार होईल...

आणीबाणी सुरू असताना, १९७५ मध्ये नोकरीनिमित्त मी उत्तर प्रदेशहून नाशिकला आलो. आणीबाणी उठल्यानंतर मी आसपासच्या परिसरात संघाच्या शाखेचा शोध सुरू केला. भगूरच्या शेटे परिवाराकडून जयरामभाई हॉस्पिटलजवळ शाखा भरत असल्याची माहिती मिळाली. तेव्हा प्रभातकुमार शर्माजी नगर कार्यवाह होते. त्यांच्यासोबतच काम सुरू केले. ते निष्ठावान स्वयंसेवक होते. पुण्याला जाताना माझ्या खांद्यावर हुंदके देत, त्यांनी ‘बागडीजी तुमच्यावर धुरा आहे,’ असे म्हटले. त्यांच्या आठवणींवर बोलायला गेलं, तर एखादं पुस्तक तयार होईल. त्यांचा स्वभाव मृदू असला, तरी प्रसंगी ते कठोरही होत. मागील कुंभमेळ्यादरम्यान ते नाशिकला आले होते. कुणा स्वयंसेवकावर संकट आल्यास, ते सर्वांना एकत्र करून, त्याच्या मदतीसाठी जात असत. कित्येकदा त्यांनी स्वयंसेवकांच्या घरी पहारे दिले.
- चंद्रपाल बागडी

आठवणी शब्दांत बांधता येणार नाही, इतके ते महान!

कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती. शर्माजींच्या आठवणी शब्दांत बांधता येणार नाही, इतके ते महान होते. नोकरीनंतर त्यांचे दुसरे प्राधान्य संघालाच होते. अत्यंत कर्मठ, पूर्णपणे संघ समर्पित व्यक्तिमत्त्व. वैचारिक बांधिलकी आणि शब्दाचेही ते पक्के होते. कार्यपद्धती, कामाबद्दलही तितकेच आग्रही होते. त्यांच्या कथनी आणि करनीमध्ये कधीच अंतर नव्हते. वडील हयात असेपर्यंत त्यांना भेटायला, ते माझ्या घरी येत असत. पुण्याहून कधी नाशिकला आल्यावर, मी त्यांची भेट घ्यायचो. प्रसंगी कठोर परंतु मनातून क्षमाशील, पायाला चाक, डोक्यावर बर्फ असं हे व्यक्तिमत्त्व. ‘जोशीजी शाखा मे क्यो नही आए’, ‘गणवेश कहा हैं आपका,’ ‘पट्टे का पॉलिश किधर गया‘ असे प्रश्न ते विचारत. शर्माजी कर्मठ असूनही नारळासारखे बाहेरून कठोर आणि आतून कोमल होते. मूळ उज्जैनचे असूनही, ते नाशिककरांमध्ये उत्तमरित्या मिसळले.
- प्रा. वसंत जोशी

‘परिवार’ ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात राबविली

नेहमी उद्दिष्ट किंवा साध्य ठेवून काम केले पाहिजे, यासाठी शर्माजींचा कायम आग्रह असायचा. त्यांची पत्नी मराठी फार शुद्ध बोलत. संपूर्ण कुटुंब संघकार्याला वाहिलेले. जर ३०० जणांचे संचलन करायचे असल्यास किमान ५०० जणांशी संपर्क व्हायला हवा, असे ते सांगत. कधी जर रागावले, तर लगेच दोन मिनिटांत जवळही करायचे. ’किर्लोस्कर’ कंपनी बंद झाल्यानंतर, त्यांना त्याची काही चिंता नव्हती. ‘दुसरी नौकरी कही तो मिल जाएगी,’ असे ते सांगत आणि खरोखर त्यांना दुसरी नोकरी लागली. यादरम्यान संघकार्य मात्र जोरात सुरू होते. महाशिवरात्रीला ११ शिवपिंडींचे दर्शन घेण्याची त्यांनी सुरू केलेली परंपरा आजही आम्ही कायम ठेवली आहे. नाशिकरोडचे संघकाम खर्‍या अर्थाने त्यांच्यामुळे मोठे झाले. ‘परिवार’ ही संकल्पना त्यांनी त्या काळात प्रत्यक्षात राबविली. त्यांच्या आवाहनानंतर नाशिकरोडहून शेकडो जण कारसेवेला गेले.
- दीपक पर्वतीकर


जवळून अनुभवलेल्या कर्मठ संघ कार्यकर्त्यांपैकी एक ...

माझ्याकडे नाशिक शहराच्या संघकामाची जबाबदारी असताना, प्रभातकुमार शर्मा यांची भेट नियमित होत असे. नाशिकरोडहून नाशिकच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या, औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ते निघत. तत्पूर्वी पहाटे लवकर उठून, संघाच्या प्रभात शाखेत जाणे व त्यानंतर स्नान, पूजा, न्याहारी आटोपून ते कामावर निघत. सायंकाळी घरी आल्यावर, आवरून लगेच संघ कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी ते बाहेर पडत. सायंकाळची शाखा, भेटी, बैठका यात रात्री उशिरा घरी परतून त्यांचा दिवस संपत असे. संघकामातील काटेकोरपणा, वेळेच्या समर्पणाचा आग्रह व वैचारिक स्पष्टता यासाठी ते मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व होते. ९०च्या दशकातील श्रीराम जन्मभूमी आंदोलनात त्यांनी नाशिकरोड परिसरातील ग्रामीण भागात समाजव्यापी संपर्क व कार्यक्रम घेतले. त्यांच्या घरीदेखील अनेक वेळा जाणे होई, तेव्हा घरी संघकार्याचा प्रभाव अनुभवास येई. त्यांच्या पत्नी (शर्मा भाभी) सर्वांचे आदरातिथ्य, आपुलकीने विचारपूस करीत. अनेकवेळा सायंकाळी शर्माजींबरोबर त्यादेखील कार्यकर्त्यांच्या घरी भेटीस जात. त्यामुळे कार्यकर्त्यांशी पारिवारिक संबंध दृढ होत. कार्यकर्त्याच्या वैयक्तिक सुख-दुःखात त्यांचा मोठा आधार असे. त्यांचा मुलगादेखील बालपणी संघकामात होता. ते पुण्यात राहण्यास गेल्यावर, त्यांचा मुलगा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असताना, संघ शाखेची जबाबदारी सांभाळत असे. पुण्यात वास्तव्यास गेल्यावर, काही वर्षे ते संघकामात सक्रिय होते. प्रकृती अस्वस्थतेने पुढे ते फार सक्रिय राहू शकले नाही. पुण्यात आल्यावर शर्मा भाभी या तर राष्ट्र सेविका समितीच्या कामात सक्रिय झाल्या. त्या समितीच्या विद्यमान अखिल भारतीय संपर्क प्रमुख असून, त्यांच्यातील नेतृत्वगुण अनुभवास येतात. त्यांच्या निधनानंतर घरी भेटीस गेल्यावर, मुलगा वैभव याने त्यांना झालेल्या श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अत्यानंदाची आठवण आवर्जून सांगितली. त्यांच्या निधनापूर्वी काही वेळ आधी झालेल्या बोलण्यात, त्यांच्या अमेरिकास्थित विवाहित कन्येने समितीच्या तेथील कार्यक्रमात ५०० सूर्यनमस्कार घातल्याचे कळल्यावर, त्यांना खूप आनंद झाल्याचे वैभवने सांगितले. संघसमर्पित कुटुंब घडवणे, हे सर्वच स्वयंसेवकांना आदर्शवत असते. प्रभातकुमार हे अशा आम्ही जवळून अनुभवलेल्या कर्मठ संघ कार्यकर्त्यांपैकी एक होते.
- दिलीप क्षीरसागर


...मात्र त्याआधीच ते आपल्यातून निघून गेले!

प्रभातकुमार शर्मा हे माझे संघगुरू. त्यांनीच मला संघात आणलं. त्याकाळी १६ सायंशाखा होत्या, इतकं त्यांनी मोठं काम केलं. त्यांचं संघटन कौशल्य उत्तम होतं. सर्वपित्री अमावस्येला ते सर्वांना जेवायला बोलवत आणि म्हणत, ‘ये हमारे संघ के भूत हैं.’ मी मुख्य शिक्षक असताना, त्यांचा मुलगा भय्यू अगदी लहानपणापासून शाखेत यायचा. शर्माजी खूप आत्मीयतेने काम करायचे. मी पद्य गायन त्यांच्याकडूनच शिकलो. काही चुकलं तर, ‘चलता हैं’ असं म्हणत, सांभाळून घ्यायचे. कंपनीतून सुटले की, ते थेट शाखेत यायचे. माझं लहानपण मध्य प्रदेशात गेल्याने, मी हिंदी त्यांच्याशी उत्तम बोलायचो. नाशिकरोडमध्ये त्यावेळी शर्माजींना ओळखत नाही, असं कुणी क्वचितच असेल. ते प्रचंड आग्रही होते. मी एकदा निवासी वर्गात म्हटलं होतं की, ‘शर्माजी का आग्रह इतना रहता हैं की, कोई अंतिम यात्रा पर तिरडी पर निकल रहा हैं, फिर भी वो उसके पास जाके बोलेंगे, अरे पहले शाखा मे आओ फिर जाओ.’ मी एकदा एवढा आग्रह बरा नसल्याचे, म्हटल्यावर ते म्हणाले, ‘ऐसा कुछ नही, सब बहाना करते हैं।’ प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीचा आढावा ते घेत असे. रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचाही त्यांना खूप आनंद झाला. निधनापूर्वी दोन दिवस आधी माझे त्यांच्याशी बोलणे झाले. शर्माजींच्या इंगळेनगर येथील शाखेला २०२५ साली ५० वर्षं पूर्ण होताहेत. या शाखेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाला आम्ही त्यांना बोलावणार होतो; मात्र त्याआधीच ते आपल्यातून निघून गेले.
भास्कर चितळे


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.