स्मिता पाटील म्हणजे माझे दैवत : पूजा सावंत

    03-Feb-2024
Total Views |
Interview with Actress Pooja Sawant

‘श्रावणक्वीन’ या स्पर्धेतून मराठी मनोरंजनसृष्टीला एक नवा चेहरा मिळाला, तो म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ’क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून पूजाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ’दगडी चाळ’, ’आता गं बया’, ’लपाछपी’ व ’नीळकंठ मास्तर’ अशा अनेक चित्रपटांत तिने विविधांगी भूमिका साकारल्या. महत्त्वाची बाब म्हणजे, ’लपाछपी’ या चित्रपटासाठी तिला दादासाहेब फाळके यांच्या १४९व्या पुण्यतिथीनिमित्त ‘दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार’ दि. २१ एप्रिल २०१८ रोजी प्रदान करण्यात आला होता. अशा या हरहुन्नरी अभिनेत्री पूजा सावंतशी दै. ’मुंबई तरुण भारत’ने साधलेला खास संवाद...

स्मिता पाटील यांचा ‘बायोपिक’ करण्याची इच्छा

चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांतून कामं करणारी सर्वकालीन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. त्यांनी अवघ्या दशकभराच्या कारकिर्दीत हिंदी, बंगाली, मराठी, गुजराती, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये बहुढंगी भूमिका साकारल्या. आजही मराठी किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नवोदित कलाकारांचा आदर्श म्हणजे स्मिता पाटील. अभिनेत्री पूजा सावंत हिच्यासाठी तर स्मिता पाटील दैवत. त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना पूजा म्हणाली की, ”ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यामुळे आज खरं तर मी अभिनय क्षेत्रात काम करत आहे. त्यांचे चित्रपट, कलाकृती पाहतच मी लहानाची मोठी झाले. त्यांना मोठ्या पडद्यावर पाहणं, ही माझ्यासाठी पर्वणी आहे, मी अक्षरशः त्यांची पूजा करते. स्मिता पाटील यांचा प्रत्येक चित्रपट मी पाहिला आहे; पण प्रामुख्याने मी आठवीत असताना त्यांचा ‘जैत रे जैत’ चित्रपट टीव्हीवर सुरू होता. त्यांचा अभिनय मी पाहिला, तेव्हा त्यांचं नाव देखील मला माहित नव्हतं. पण, कालांतराने त्यांचे अनेक चित्रपट मी पाहू लागले, त्यावेळी माझ्यासाठी कलेची आणि अभिनयाची व्याख्याच स्मिता पाटील झाल्या. खरं तर अभिनय क्षेत्रात येण्याचा माझा कधी विचार नव्हता; परंतु जर का अभिनेत्री झाले, तर स्मिता पाटील यांच्यासारखं काहीतरी काम करायचं, हे मात्र मनाशी पक्कं केलं.”

पुढे पूजा तिच्या मनातील एक मोठी इच्छा व्यक्त करत म्हणाली की, “स्मिता पाटील यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट जर केला, तर त्यांचीच व्यक्तिरेखा मला साकारण्याची मनापासून इच्छा आहे. ज्यावेळी त्यांचा ‘बायोपिक’ होईल, त्यावेळी त्यात स्मिता पाटील यांची भूमिका मी साकारावी हा माझा हक्क आहे, असे मी मानते.”

व्यावसायिक नाटक मिळालं नाही याची खंत

प्रत्येक कलाकाराची सुरुवात ही रंगभूमीपासून होते. शाळा, महाविद्यालयात सादर केलेल्या लहानशा नाटिका ते एकांकिकेपर्यंतचा प्रवास कलाकारांना एक नवी उमेद आणि जिद्द प्रदान करुन जातो. परंतु, अभिनय क्षेत्रातच पुढे कारकिर्द करायची, असा विचार न केलेल्या पूजाने देखील नाटिका आणि एकांकिकेत कामं केली होती. जुन्या आठवणींना उजाळा देत पूजा म्हणाली की, “माझं महाविद्यालयीन शिक्षण ‘एसआयडब्ल्यूएस’ या साऊथ इंडियन महाविद्यालयातून झाले. परंतु, तिथे मराठी वाङ्मय मंडळ होतं आणि त्यात मी अनेक एकांकिका सादर केल्या होत्या. काही खडूचे तुकडे, गुण्या गोविंदाने अशा बर्‍याच एकांकिकेत मी विविधांगी भूमिका साकारल्या.” पुढे पूजा म्हणाली की, ”अजूनही माझ्या वाट्याला एकही व्यावसायिक नाटक आलं नाही, याची मला नक्कीच खंत आहे.”

हिंदी चित्रपटांच्या आठवणीत रमताना...

मराठीसह पूजाने हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले नशीब आजमावले. २०१९ साली पूजाने चार्ल्स रसेल दिग्दर्शित ’जंगली’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत अभिनेता विद्युत झळकला होता. या चित्रपटाची खास आठवण सांगताना पूजा म्हणाली की, ” ‘जंगली’ चित्रपटाचे मी चित्रिकरण करत होते. त्यासाठी जंगलात खर्‍या हत्तींसोबत आम्हाला काही प्रसंग चित्रीत करायचे होते. तेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शक मला म्हणाले की, कॅमेर्‍याला तू खूप आवडतेस. ज्यावेळी तुझा क्लोजप शॉट लागतो, त्यावेळी तू कॅमेर्‍यावर वेगळीच दिसतेस. ही माझ्या पहिल्याच हिंदी चित्रपटातील कामाबद्दल मिळालेली, पहिली पोचपावती कायम लक्षात राहणारी आहे.”

रसिका शिंदे-पॉल
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.