लालकृष्ण अडवाणी : भारतीय राजकारणाचा चेहरामोहरा बदलणारे नेतृत्व

    03-Feb-2024
Total Views |
Bharatratna award to Lal krishn Advani

देशाचे माजी उपपंतप्रधान, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि हिंदुत्ववादी राजकारणाचे समर्थ नेतृत्व लाभलेल्या लालकृष्ण अडवाणी यांना भारत सरकारने ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान काल जाहीर केला. अडवाणी यांचे भारतीय राजकारणातील योगदान अनन्यसाधारण आहे, त्यास उजाळा देणारा ज्येष्ठ पत्रकार तरूण विजय यांचा विशेष लेख.
 
लालकृष्ण अडवाणींना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर होणे, हा खरोखरच सर्वोच्च सन्मान आहे. एकेकाळी अवघे दोन खासदार लोकसभेत निवडून आलेल्या भाजपला सत्तासोपानापर्यंत पोहोचविणारे सेनानी हे अडवाणीच होते, हे कदापि नाकारता येणार नाही. ज्यावेळी भाजपची स्थापना झाली, त्यावेळी राष्ट्रीय राजकारणाची स्थिती अतिशय वेगळी होती. त्या काळात भाजपबद्दल बोलले जायचे की, भाजप राजकारणातील ए. के. हंगलच! म्हणजे ए. के. हंगल ज्याप्रमाणे चित्रपटामध्ये ‘साईड कॅरेक्टर’ असायचे, त्याचप्रमाणे हा पक्ष नेहमीच बाजूला राहील आणि केवळ काँग्रेस व कथित धर्मनिरपेक्ष पक्षच मुख्य प्रवाहात राहतील. मात्र, अडवाणी यांनी हा समज अतिशय ठामपणे भिरकावून दिला आणि भाजपला राष्ट्रीय राजकारणातील प्रमुख पक्षाचे स्थान प्राप्त करून दिले.

हिंदूंवर हल्ला करणे आणि त्यांच्या श्रद्धांवर टीका करणे, ही धर्मनिरपेक्षता मानली जाण्याचा तो काळ होता. अशा वेळी देशातील राजकीय क्षेत्राची दिशा आणि प्रवृत्ती बदलण्यात अडवाणी यशस्वी झाले. ‘स्यूडो-सेक्युलॅरिझम’वर चर्चा सुरू करण्याचे धाडस त्यांच्यापूर्वी कोणीही दाखवले नव्हते. हिंदुत्वावर आधारित राजकारण देशातील प्रत्येकामध्ये एकोपा निर्माण करू शकते, हा विश्वास त्यांनीच निर्माण केला. त्याच काळात भाजपची धुरा त्यांच्या हाती होती. परिणामी, तेव्हाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे पंतप्रधानपदासाठीचा नैसर्गिक उमेदवार म्हणून पाहिले जात होते. मात्र, तेव्हा त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये अटलजींच्या नावाची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्यचकीत केले.

अडवाणीजींच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि निर्णायक टप्पा म्हणजे श्रीराम जन्मभूमी आंदोलन. या आंदोलनास जनमानसामध्ये प्रस्थापित करण्यामध्ये त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच ’श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रणेते’ ही त्यांची ओळख सर्वार्थाने सार्थ ठरते. अडवाणींनी त्यासाठी सोमनाथ ते अयोध्या अशी भव्य रथयात्रा काढली होती. या यात्रेमध्ये मलादेखील नरेंद्र मोदी यांच्यासोबत सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यातील एक प्रसंग खास सांगण्यासारखा आहे.

एका गावात अडवाणींच्या रथयात्रेच्या आगमनाची वेळ ही रात्री ९ वाजताची होती. वाटेत गर्दीमुळे एवढा उशीर झाला की, आम्ही रात्री १ वाजता त्या गावात पोहोचलो. मात्र, एवढ्या रात्रीदेखील त्यांच्या स्वागतासाठी हजारो लोक रस्त्यावर उभे होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी लोकांचा उत्साह रात्रीदेखील कायम होता. गावात रथाचे आगमन झाल्यावर, प्रथम त्याचे पूजन करण्यात आले. पुढेही ते ज्या-ज्या गावात जात, तेथेही असाच उत्साह पाहायला मिळत असे. त्यामुळेच अडवाणींना ‘हिंदू नवजागरणाचा अग्रदूत’ मानले जाते.

अडवाणीजींचा स्वभाव अतिशय दयाळू आहे, कार्यकर्त्यांप्रति त्यांच्या मनात नेहमीच स्नेह असतो. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशीही हे नेहमीच भक्कमपणे उभे असतात. नरेंद्रभाई मोदी यांच्यावर त्याकाळी जेव्हा- जेव्हा संघटनेमध्ये संकटाची स्थिती निर्माण झाली, त्या-त्या वेळी अडवाणीजील ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. एवढेच नव्हे तर अटलजींनाही त्यांनी नरेंद्रभाईंना साथ देण्यासाठी तयार केले. नरेंद्रभाईदेखील अडवाणीजींविषयी नेहमीच आदर व्यक्त करतात.

अडवाणीजींसोबत दीर्घकाळ अतिशय जवळून काम करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे त्यांच्या विनम्र, शांत आणि कधीही विनाकारण आक्रमक न होणार्‍या स्वभावाशी मी चांगला परिचित आहे. ’सिंधू दर्शन’ कार्यक्रमास त्यांनी पूर्ण पाठिंबा व आशीर्वाद दिला, ज्यामुळे लडाखचे संरक्षण झाले आणि त्या ठिकाणच्या आर्थिक विकासासाठी अभूतपूर्व मदत झाली.

अडवाणी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक. ‘भारतरत्न’ जाहीर झाल्यानंतर जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये त्यांनी परमपूज्य श्रीगुरुजींचा प्रसंग उद्धृत केला आहे, ज्यात त्यांनी ’इदम् न मम, इदम् राष्ट्राय स्वाहा’ म्हणत, सर्व काही राष्ट्रार्पण केले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्याबद्दल त्यांची अपार भक्ती इतकी होती की, त्यांना ‘अभिन्न मानवतावादाचे व्याख्याते’देखील म्हटले जाते.

अडवाणीजी हे ’ऑर्गनायझर’मध्ये चित्रपटांचे समीक्षणही लिहीत असत. ज्यावेळी के. आर. मलकानी हे अमेरिका दौर्‍यावर गेले होते, त्यावेळी त्यांची जबाबदारी स्वीकारणार्‍या अडवाणीजींची चित्रपटाविषयीची रुची तर जगप्रसिद्ध आहेच. त्यामुळे दिल्लीतील महादेव रोडस्थित ऑडिटोरियममध्ये त्यांच्यासोबत अनेक चित्रपट बघण्याची मलाही संधी मिळाली. एकदा देहराडूनला एका अतिशय चिंचोळ्या गल्लीतील आमच्या घरी माझ्या आईला भेटण्यासाठी ते आले होते, त्यावेळी संपूर्ण शहर आश्चर्यचकीत झाले होते आणि सुरक्षा कर्मचारीही खूप चिंतेत होते. विशेष म्हणजे, त्या रात्री आम्ही सगळे देहराडूनच्या थिएटरमध्ये चित्रपट पाहायला गेलो होतो.

अडवाणीजी शाकाहारी आहेत. मर्यादित जेवणे आणि आहाराची शिस्त पाळणे हे त्यांचे विशेष गुण आहेत. त्यांना चॉकलेट खूप आवडतात, त्यांच्याकडे पुस्तकांचा प्रचंड मोठा साठा आहे. ‘पांचजन्य’साठी मला पहिल्यांदा १९७९ साली त्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. राजकारणात असले, तरीदेखील ते खूप भावनिकही आहेत. अगदी लहानशा भावुक प्रसंगातही त्यांच्या डोळ्यात पाणी तरळते. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या मुलांना राजकारणात येण्यासाठी कधीही प्रोत्साहन दिले नाही. त्यांच्या कन्या प्रतिभामध्ये त्यांचा जीव आहे, तर त्यांच्या पत्नी म्हणजेच आमच्या कमलावहिनी आडवाणीजींना आपला ‘राम’ मानत.

अडवाणीजी दीर्घायुषी होवोत आणि आणि खर्‍या ’भारतरत्ना’प्रमाणे सर्वांना राष्ट्रवादाची प्रेरणा देत राहो, हीच माझी सदिच्छा.

तरुण विजय
(लेखक माजी राज्यसभा सदस्य आणि ‘पांचजन्य’चे माजी संपादक आहेत.)
(अनुवाद : पार्थ कपोले)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.