आत्मनिर्भर भारताच्या दिशेने...

    03-Feb-2024
Total Views |
Atmanirbhar bharat mission government

यशस्वी अवकाश मोहिमा, संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकडे तरुणाईचा वाढत कल, पायाभूत सुविधा क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाकडे वेगाने होणारी कूच, हे पाहता २०४७चा विकसित भारत कसा असेल, याचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. अंतरिम अर्थसंकल्पातही याच ‘विकसित भारता’चे प्रतिबिंब उमटलेले दिसते. अशा वेळी प्रशिक्षित आणि तंत्रकुशल मनुष्यबळ उभारणीत देशातील तांत्रिक प्रशिक्षण संस्थांचा देखील मोठा वाटा आहे. याच पार्श्वभूमीवर ओडिशामधील सीटीटीसी, भुवनेश्वरच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख.

भारताचे माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांच्या दूरदृष्टीतील भारत हा तंत्रज्ञानस्नेही आणि तंत्रज्ञानाचा वापर करणार्‍या रोजगारक्षम युवकांचा होता. हे ‘व्हिजन’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भारताने सत्यात उतरवत, आज २०२४ मध्ये यशस्वीरित्या चंद्रावर आपल्या पाऊलखुणा उमटविल्या आहेत. इतक्यावरच न थांबता, भारताने ’आदित्य’ मिशन यशस्वी करत, सूर्याच्या दिशेनेही ऐतिहासिक झेप घेतली. यामध्ये ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ (इस्रो)सह भारतातील तज्ज्ञ, संशोधक, विद्यार्थी संशोधक, विद्यापीठे आणि तांत्रिक शिक्षण देणार्‍या संस्था यांनी मोलाचे योगदान दिले. त्यापैकीच एक संस्था म्हणजे ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथील ’सेंट्रल टूल रूम अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटर’ (सीटीटीसी) ही संस्था तांत्रिक आणि अभियांत्रिकी शिक्षण देत, तरुणांना रोजगारक्षम बनवते आहे.

Atmanirbhar bharat mission government


ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये ११.३ एकर क्षेत्रात ’सीटीटीसी’ म्हणजेच ’सेंट्रल टूल रूम अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटर’ विस्तारलेले आहे. ’आयएसओ’ मानांकन प्राप्त या संस्थेतून दरवर्षी जवळपास ३० हजार विद्यार्थी शिक्षित, प्रशिक्षित होऊन देशभरातील बड्या उद्योग समूहामध्ये नोकरी करत आहेत. या संस्थेतून शिक्षण घेतलेले जवळपास ५० टक्के विद्यार्थी हे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात (एमएसएमई) आपले कौशल्य आजमावित आहेत. भारत सरकार आणि डेन्मार्क सरकारच्या तांत्रिक सहकार्य उपक्रमातून अभियांत्रिकी क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्यासाठी १९९१ मध्ये संस्थेची स्थापना करण्यात आली, तर १९९५ मध्ये इथे टूल उत्पादन सुरू झाले. यासाठी लागणारी जमीन, इमारत इत्यादी उत्कृष्ट पायाभूत सुविधांमध्ये ओडिशा सरकारचे बहुमोल योगदान आहे.
 
औद्योगिकीकरणाच्या आजच्या युगात विशेषतः अभियांत्रिकी क्षेत्रात डायज, जिग्स, फिक्स्चर, मोल्ड, गेज आणि इतर अचूक घटकांची आवश्यकता अपरिहार्य आहे. त्याचबरोबर दर्जेदार टूलमेकर, टूल आणि प्रोडक्ट डिझायनर्स, कुशल उत्पादक, पीएलसी आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशन इंजिनिअर्स आणि मेंटेनन्स इंजिनिअर्सची मागणीही वेगाने वाढत आहे. ’सेंट्रल टूल रूम अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटर’, भुवनेश्वर हे अशा प्रकारचे प्रशिक्षण, उत्पादन, डिझाईन आणि सल्लागार केंद्र आहे, जे केंद्र सरकारच्या तांत्रिक सहकार्य कार्यक्रमाअंतर्गत स्थापन करण्यात आले आहे.

विदेशातून आयात केल्या जाणार्‍या विविध यंत्रसामग्रीला ’सीसीटीसी’ने पर्यायी ठरणारी अद्ययावत यंत्रसामग्री घडविली आहे. ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’, एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी, संरक्षण संसोधन व विकास संस्था यांसह काही देशी कंपन्यांना आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामग्रीचे सुट्टे भाग पुरविण्याचे काम ‘सीटीटीसी’मार्फत केले जात आहेत. तंत्रज्ञानस्नेही प्रशिक्षित तरुणाईने आज उद्योग जगतात, आपले पाय रोवले आहे. हीच ’सीटीटीसी’च्या कार्याची पोचपावती असल्याचे ‘सीटीटीसी’चे प्रमुख एस. के. कर यांनी महाराष्ट्रातून ओडिशाच्या भेटीवर आलेल्या पत्रकारांना सांगितले. डॉ. के. एम. राजन, के. विजयकुमार यांच्यासह विविध खात्यांच्या प्रमुखांनी संस्थेच्या कार्याची माहिती देऊन, यांत्रिक प्रात्यक्षिके सादर केली.

या केंद्रात पारंपरिक ते आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेकडो मशिनरी हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाते. ’सीटीटीसी’मध्ये टर्नर, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशीन टूल ऑपरेटर, टूल व डायमेकर, मशिनिस्ट, मेकाट्रॉनिक्स, कैड कॅम, अ‍ॅरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मशीन मेंटेनन्स अ‍ॅण्ड अ‍ॅटोमेशन, इलेक्ट्रिक उपकरणे दुरुस्ती व देखभाल, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, रोबोटिक्स यांसारखे जवळपास ३१ प्रकारचे अभ्यासक्रम शिकविले जातात. दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, पदवीधारक विद्यार्थी या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत. इतकेच नाही तर अर्ध्यावर शाळा सुटलेल्या मुलांनाही या संस्थेत यशस्वी प्रशिक्षण घेत, प्रतिष्ठित नोकरी करण्याची संधी मिळालेली आहे.

या संस्थेत ग्रंथालय, संगणकीय वर्गासह अत्याधुनिक प्रयोगशाळा आहेत. मागील काही वर्षांत या क्षेत्रात प्रशिक्षण घेण्यासाठी येणार्‍या तरुणांची संख्या घटली आहे. मात्र, भारताने ’कोरोना’नंतर ‘आत्मनिर्भरते’कडे वाटचाल करत असताना आद्योगिक आणि संरक्षण इतर देशांतून आयात होणार्‍या अनेक मशिनरी आणि टूल्सना पर्यायी अशा अद्ययावत पर्याय भारतातच तयार केले. इतकेच नाही तर ’सीटीटीसी’देखील स्वतः निर्माण केलेले अनेक टूल्स इतर देशात निर्यात करते आहे. ही भारतासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या माध्यमातूनच देशात रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करणे शक्य आहे. त्यामुळे ’सीटीटीसी’ सारख्या संस्थांचे जाळे देशभरात पसरले पाहिजे. यामुळे कमी खर्चात आणि शिक्षण अर्ध्यात सुटलेल्या अनेक तरुणांना शिक्षण आणि प्रशिक्षणाची नवी दारे खुली होतील. यातूनच ’आत्मनिर्भर’तेच्या वाटेवरून विकसित भारतासाठी ही नवी नांदी ठरेल.

गायत्री श्रीगोंदेकर
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.