मुंबई : संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. संगीत, नृत्य, नाट्य, रंगभूमी, पारंपारिक संगीत/नृत्य/नाट्य अशा अनेक प्रकारातून एकूण ९२ नावे निवडली गेली. या सर्वांना २०२३ सालचे संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारांच्या विजेत्यांच्या यादीत मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री ऋतुजा बागवे यांचा समावेश आहे. तर संगीतासाठी कोमकली कलापिनी हिचाही समावेश आहे.
अशोक सराफ यांना नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, त्यानंतर आता त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच अभिनय क्षेत्रातच ऋतुजा बागवेला देखील संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लवकरच राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.
संगीत नाटक अकादमीची स्थापना भारतीय शिक्षण मंत्रालयाने 31 मे 1952 रोजी केली. त्याच पुढील वर्षी त्याचे पहिले अध्यक्ष डॉ. पी. व्ही. राजमन्नर यांची नियुक्ती झाली. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 28 जानेवारी 1953 रोजी संसद भवनात आयोजित एका विशेष कार्यक्रमात याचे उद्घाटन केले होते. या अकादमीने आजवर अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले. संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्रातील अनेक कलावंत या अकादमीमुळे घडले व नावारूपास आले. अकादमीची फेलोशिप आणि पुरस्कार अतिशय प्रतिष्ठित मानले जातात.
खूप छान वाटतंय, इतका मोठा पुरस्कार मला करिअरच्या सुरुवातीलाच मिळाला. अजून बरच काम करायचे आहे. आणि आता या पुरस्काराची जबाबदारी ही माझ्यावर आली आहे. या पुढचंही काम करताना त्याच जबाबदारीने करावे लागणार आहे आणि आता कृतज्ञता हीच भावना आहे. देवाचे आई-वडिलांचे आणि सर्व प्रेक्षकांचे आणि माझ्या सर्व दिग्दर्शकांचे आभार, त्यांनी माझ्याकडून काम करून घेतलं आणि इतक्या मोठ्या पुरस्कारासाठी मी पात्र ठरले.
ऋतुजा बागवे, अभिनेत्री