मुंबई : वीज उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'महानिर्मिती'मधील सर्वोच्च पदावर पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. वित्त व लेखा या पदावर कार्यरत असलेल्या तृत्पी नितीन मुधोळकर यांची मुख्य महाव्यवस्थापक(वित्त व लेखा) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, तृप्ती मुधोळकर यांची महानिर्मिती मुख्य महाव्यवस्थापक(वित्त व लेखा) म्हणून मुख्यालय मुंबई पदोन्नती मिळाली आहे. तसेच, या पदावर विराजमान होणाऱ्या त्या महानिर्मितीच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.
तृप्ती नितीन मुधोळकर यांचा आतापर्यंतचा प्रवास
चार्टर्ड अकाऊंटंट पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्या ऑगस्ट १९९६ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात ४०० के व्ही जी सी आर नागपूर येथे व्यवस्थापक(वित्त व लेखा) म्हणून रुजू झाल्या.
त्यानंतर स्थापत्य विभाग खापरखेडा, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र, कोळसा विभाग नागपूर, कोराडी औष्णिक विद्युत केंद्र, बांधकाम विभाग कोराडी आणि आता मुख्यालय मुंबई इत्यादी ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर त्यांनी यशस्वीरीत्या काम केले.
महानिर्मितीमध्ये व्यवस्थापक(वित्त व लेखा) ते मुख्य महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अश्या विविध महत्वपूर्ण पदांवर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.
महानिर्मितीमध्ये त्यांना स्थापत्य, प्रकल्प, संचलन व सुव्यवस्था, अंतर्गत लेखा परीक्षण, कॉर्पोरेट अकाऊंटस चा विपुल अनुभव त्यांचे पाठीशी आहे.
यासोबतच महापारेषण कंपनीत "वित्तीय तज्ज्ञ" म्हणून त्या संचालक पदी कार्यरत आहेत.