तिकीटालय! मराठी रसिक प्रेक्षकांसाठी नवे तिकीट बुकिंग ॲप सेवेसाठी सज्ज

27 Feb 2024 14:07:56
 
prashant damale
 
मुंबई : मराठी भाषेचा गौरव आणि आदर प्रत्येकाच्या मनात निर्माण करणारे कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस अर्थात २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. आज याच दिवसाचे औचित्य साधत चित्रपट, नाटक, मालिका, संगीत अशा अनेक माध्यमांमध्ये तयार होणाऱ्या मराठी कलाकृती प्रेक्षकांना एकाच ॲपमध्ये मिळाल्या पाहिजेत असा अट्टहास करणारे अभिनेते प्रशांत दामले यांच्या मार्गदर्शनाखाली 'तिकीटालय' हे मराठमोळं ॲप प्रेक्षकांच्या सेवेत आले असून आज दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात या ॲपचे उद्घाटन महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक महेश कोठारे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अन्य मान्यवर कला क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.
 
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत ‘तिकिटालय’ या मराठमोळ्या मनोरंजनात्मक व तिकीट बुकिंग ॲपचा शुभारंभ झाला असून प्रेक्षकांना या ॲपवर आपल्या सोयीनुसार तिकीटांचे बुकिंग करता येणार आहे. बऱ्याचदा मराठी नाटक, चित्रपट, संगीत असे विविध कार्यक्रम कुठे आहेत याची माहिती प्रेक्षकांना मिळत नाही. आणि इतर तिकीट बुकिंग ॲपच्या जंजाळात मराठी कालकृती हरवून जातात आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. याचसाठी तिकीटालय हे ॲप सुरु केले असून यावर फक्त मराठी भाषेतील कालकृतींचीच माहिती प्रेक्षकांना मिळणार आहे.
 
‘तिकिटालय’बद्दल अधिक माहिती देताना प्रशांत दामले म्हणाले, “मराठी करमणुकीच्या क्षेत्रासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे अशी इच्छा गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून माझ्या डोक्यात होती. त्यामुळे तिकिटालय या ॲपची संकल्पना मला सुचली. या ॲपवर सगळी माहिती प्रेक्षकांना उपलब्ध होईल. कोणतं नाटक कुठे सुरू आहे? चित्रपट किंवा संगीत कार्यक्रम कुठे आहे? याची सगळी माहिती तुम्हाला अगदी सहज मिळेल. मराठी नाट्य निर्मात्यांना देखील हे ॲप खूप सोयीचे ठरणार आहे मराठी चित्रपट, नाटक याशिवाय या ॲपवर प्रेक्षकांना इतर कार्यक्रम पण केवळ मराठी कलाकृतींविषयकच माहिती मिळेल,” असे दामले म्हणाले. शिवाय जास्तीत जास्त प्रेक्षकांनी येत्या काळात या बुकिंग ॲपचा वापर करावा असे आवाहन देखील त्यांनी केले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0