“दोन आनंदरावांचे ऑमलेट्स द्या”, राज ठाकरेंनी सांगितला श्रीरंग गोडबोलेंचा विनोदी किस्सा

27 Feb 2024 17:30:50

raj thackeray and shrirang godbole 
 
मुंबई : मराठी मनोरंजमसृष्टीतील सहकलाकारांचा आपण आदर करत त्यांना टोपणनावाऐवजी आदराने हाक मारली पाहिजे असा सल्ला काही दिवसांपुर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखिल भारतीय नाट्य संमेलनात दिला होता. आज २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी रसिक प्रेक्षकांसाठी तिकीटालय हे ॲप लॉंच करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, दिग्दर्शक महेश कोठारे देखील उपस्थित होते.
 
तर झालं असं की, या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अभिनेता संकर्षण कऱ्हाडे करत होता. त्याने सवयीप्रमाणे नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्याबद्दल बोलताना चंकु सर असे म्हटले. यावर राज ठाकरे यांनी त्याला मार्मिक शब्दांत सुनावले. ते म्हणाले की, “अखिल भारतीय नाट्य संमेलनात मी एक महत्वाची गोष्ट सांगितली होती, ती म्हणजे कोणत्याही कलाकारांना त्यांच्या टोपणनावाने हाक मारु नये, आपणच एकमेकांचा आदर केला पाहिजे. तर चंकु सर असं कधी नसतं. त्यामुळे चंद्रकांत कुलकर्णी सर असं मी समज शकतो, त्यामुळे यापुढे या गोष्टींकडे अधिक लक्ष देणं आणि त्या सुधारणं फार गरजेचं आहे”.
 
पुढे त्यांनी दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांचा एक भन्नाट विनोदी किस्सा देखील सांगितला. ते म्हणाले, “ काही दिवसांपुर्वी माझ्याकडे दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले आले होते. त्यांनी सांगितलं की मी कॅफे गुडलकमध्ये गेलो होतो जेवायला. त्यावेळी तिथे मी सांगितलं की मला दोन आनंदरावांची ऑमलेट्स द्या. कारण आता अंड्या बोलायचं नाही म्हटल्यावर काय करणार”. असा विनोदी किस्सा सांगत पुन्हा एकदा मराठी कलाकारांना एकमेकांचा आदर करण्याची आठवण देखील राज ठाकरे यांनी करुन दिली.
Powered By Sangraha 9.0