दि.९ फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये संसदेच्या आणि चार प्रांतांच्या निवडणुका झाल्या. दोन दिवस चाललेल्या गोंधळानंतर निकाल लागले. पाकिस्तानी सैन्याला आणि त्यांच्या मित्रपक्षांना निवडणुकांमध्ये अपेक्षित असलेले परिणाम मिळाले नसले तरी सत्ता स्थापन करण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळेच मागच्या १८ दिवसांपासून पाकिस्तानच्या सत्तास्थापनेचा सावळा गोंधळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
बिलावल भुट्टोंनी हो-नाही करत शेवटी शरीफांच्या ’पीएमएल-एन’ला पाठिंबा दिला. या पाठिंब्याच्या बदल्यात बिलावल यांचे वडील आसिफ अली झरदारी यांना राष्ट्रपती पद मिळणार आहे, तर पाकिस्तानच्या संसदेचेसुद्धा सभापती पदसुद्धा त्यांच्याकडे असेल, असे सांगितले जाते. त्यासोबतचं आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यावेळी नवाज शरीफ यांच्या जागी त्यांचे बंधू शाहबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होणार आहेत, तर पाकिस्तानमधील आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या प्रभावशाली राज्य असलेल्या पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी नवाज यांची कन्या मरियम नवाज यांची वर्णी लागली आहे.
मरियम नवाज यांच्या रुपाने पाकिस्तानात प्रथमच एक महिला मुख्यमंत्री दिसेल. भारताला सुचेता कृपालाणी यांच्या रुपाने १९६३ मध्येच पहिल्या मुख्यमंत्री (उत्तर प्रदेश) मिळाल्या होत्या. भारतात आजपर्यंत १६ महिला मुख्यमंत्री झाल्या. दुसरीकडे पाकिस्तानला ही गोष्ट साध्य करण्यासाठी तब्बल ७६ वर्षं लागली. धार्मिक कट्टरतावादाच्या आहारी गेलेल्या पाकिस्तानमध्ये एक महिला मुख्यमंत्री होतेय, ही पाकिस्तानमधील महिलांना काही प्रमाणात दिलासा देणारी गोष्ट. पण, खरचं घराणेशाहीच्या राजकारणातून मुख्यमंत्री झालेल्या मरियम नवाज पाकिस्तानी महिलांना न्याय देऊ शकतील का, हा खरा प्रश्न!
भारतामध्ये ज्याप्रकारे आजीप्रमाणे नाक दिसतं म्हणून घराणेशाहीच्या दारातून राजकारणात प्रवेश होतो, तसंच काहीसं मरियम नवाज यांच्याबाबतीत सुद्धा. मरियम यांचे राजकारणात येण्यापूर्वीचे एकमेव कर्तृत्व म्हणजे, त्या नवाज शरीफ यांच्या कन्या आहेत, एवढचं. २०१२ मध्ये त्यांनी आपल्या वडिलांची आणि काकांच्या सोशल मीडियाची जबाबदारी आपल्या हातात घेतली होती. तेव्हा मरियम आपलं काम फक्त सोशल मीडिया प्रचारापर्यंतच मर्यादित आहे. मी राजकारणात प्रवेश करणार नाही, असे सांगायच्या. पण, २०१३ ते २०१७ दरम्यान कोणत्याही सरकारी पदावर नसताना आपल्या वडिलांच्या सरकारमध्ये त्यांचा हस्तक्षेप होताच. २०१६ मध्ये ‘पनामा पेपर्स’मध्येसुद्धा त्यांचे नाव झळकले होते.
याचाच, अर्थ मरियम पडद्यामागून सरकारी कामांमध्ये आणि पक्षांतर्गत राजकारणामध्ये ढवळाढवळ करत होत्या, हे उघड. २०१७ मध्ये अमेरिकेतील वृत्तपत्र ‘न्यूयार्क टाईम्स’ने जगातील सर्वांत शक्तीशाली महिलांच्या यादीत त्यांना स्थानही दिले होते. २०१७ मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे नवाज शरीफ यांना सत्ता सोडावी लागल्यानंतर, मरियम सक्रिय राजकारणात आल्या. त्याचे फळ त्यांना आता मिळत आहे. कोणताही प्रशासकीय अनुभव गाठीशी नसताना पंजाबसारख्या महत्त्वाच्या प्रांताचे मुख्यमंत्रिपद त्यांच्या गळ्यात पडले आहे. प्रशाकीय अनुभवाच्या कमतरेबरोबरच मरियम यांना ‘पीएमएल-एन’च्या वरिष्ठ नेत्यांची मर्जीसुद्धा राखावी लागेल, शिवाय पक्षांतर्गत कुरघोड्यांनाही सामोरे जावे लागेल.
पाकिस्तानची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून मरियम नवाज इतिहासात आपले नाव नोंदवत असल्यातरी पाकिस्तानच्या जनतेने आणि खासकरून महिलांनी त्यांच्याकडून किती अपेक्षा करावी, हासुद्धा मोठा प्रश्न. एकीकडे मरियम नवाज यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागत असताना, अरबी भाषेत मजकूर लिहिलेला ड्रेस घातल्यामुळे एका महिलेला रस्त्यावर कट्टरपंथी जमावाने विळखा घातला. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केला नसता, तर ईशनिंदेच्या आरोपाखाली या महिलेचा जीव घ्यायला धार्मिक कट्टरपंथीयांनी मागे-पुढे पाहिले नसते.
धर्माच्या नावाखाली मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणे, महिलांचे शोषण करणे यामध्ये पाकिस्तान आघाडीवर आहे. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या मरियम यांना पाकिस्तानच्या या परिस्थितीची किती जाणीव आहे? हासुद्धा संशोधनाचा विषय. पाकिस्तानमधील शोषित महिलांना, अल्पसंख्याकांना न्याय देण्याचे काम मरियम यांना करावे लागेल. तरच त्यांच्या मुख्यमंत्रिपदी बसण्याला अर्थ प्राप्त होईल, अन्यथा त्यांचे मुख्यमंत्रिपदी बसणे फक्त सांकेतिकच ठरेल.