चांदफळ

    26-Feb-2024
Total Views |




chandfal


देवरहाटीचा रक्षक म्हणून दिमाखात उभ्या असणार्‍या, पण प्रचार-प्रसार तितकाच कमी झालेला वृक्ष म्हणजे चांदफळ. याच वृक्षाची महती विशद करणारा हा लेख...


देवराईमध्ये पाऊल ठेवताक्षणी ज्यांची नजर सावरलेली आहे त्यांना मंदिराच्या पार्श्वभूमीला किंवा आजूबाजूला उभे असणारे त्यांच्या हिरव्या पडद्याने संपूर्ण आकाशाला झाकून टाकणारे, मोठ्या वेलींनीकेलेल्या गुंडाळ्यातून आपले प्रचंड मोठ्या आकाराचे बाहू आकाशाकडे अलगद वर करून ताठ मानेने उभे असलेले आणि ज्याची खोडे आणि मुळे एखाद्या स्क्विडप्रमाणे वळवळ करत अख्ख्या राहाटीला गिळून टाकतात की काय असा आभास निर्माण करणारे पुराण वृक्ष नजरेस पडतात. बेहडा, नांदरुख, शिडाम, आंबा असे अनेक मोठा बुंधा असणारे वृक्ष गर्दी करून असले तरी या गर्दीत आपले लक्ष सर्वप्रथम वेधून घेतो तो म्हणजे ‘दासवन’. या वृक्षाला स्थानिक भाषेत ‘चांदफळ’ किंवा ‘चांदफोक’ असे म्हटले जाते. जे काही वृक्षगण या आधुनिक जगाच्या सुरुवातीपासून मानवी इतिहासाचे साक्षीदार म्हणून उभे आहेत, त्यात या चांदफळाचा समावेश होतो आणि म्हणूनच आफ्रिकेतील सवाना गवताळ प्रदेश, सुदान, केनिया आणि आशियातील भारत, चीन, मलेशिया या भागात ही अनोखी वृक्षप्रजाती आढळून येते.

जावन भाषेमध्ये या चिकाचा उपयोग डार्ट मारून केले जाणारे शिकारीसाठी केला जात असल्याने इपोह किंवा ‘उपस ट्री’ म्हटले जायचे आणि याचे शास्त्रीय नाव ‘Ntiaris toxicaria’ असे आहे. भारतात हे वृक्ष महाराष्ट्र, गोवा, केरळ आणि कर्नाटकातील सह्याद्री पर्वताच्या वनराईमध्ये आणि ठरावीक देवरायांमध्ये आढळतात. यांचा मोठा होणारा आकार, अख्ख्या जंगलाला कवेत घेईल, अशी पर्णछाया आणि लांबवर पसरलेली मुळे काही गुंठे किंवा एकरात जमीन काबीज करतात. स्वतः कडक उन्हाचा, उभाआडव्या पावसाचा आणि डोंगरावर आपटून उलट फिरणार्‍या वार्‍याचा सामना करत आपल्या कवेत लहान तरुवरांना संरक्षण देणारे आणि पालापाचोळ्याच्या खताच्या रूपाने अन्न पुरवणारे हे पुराणवृक्ष देवराईच्या पालकाचे काम करत नसतील तर नवलच. वर्षानुवर्षांच्या आयुष्यात आपल्या अंगाखांद्यावर शेवाळे, नेचे आणि म्हातार्‍याच्या कानाला केस यावेत तसे बुरशीचे तंतू वाढवत हे पुराण वृक्ष देवरहाटीचे रक्षक म्हणून वर्षानुवर्षे उभे आहेत. काही चांदफळांचा घेरा तब्बल 15 ते 20 फूट असून उंची 100 फुटाहून सुद्धा अधिक आहे.




chandfal

या पुराण वृक्षांचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यांच्या चीक जरी विषारी असला तरी यांचे बहुतांशी अवयव कुठे ना कुठे मानवी उपयोगात वर्षानुवर्ष वापरले जात आहेत. छोट्या फांद्या, काटक्या सरपणासाठी तर काही झाडांचे लाकूड फर्निचर उद्योगात वापरले जाते. याच्या साली अनेक आदिम जमाती वल्कले म्हणून वापरत आणि याच्या नियमित वापराने संधीवात गुडघेदुःखीसारखे आजार दूर राहत असे अजूनही काही वृद्ध व्यक्ती सांगतात. चांदफळाचा सर्वाधिक उपयोग औषधी म्हणून केला जातो तो म्हणजे मधुमेहावरील रामबाण उपाय म्हणून. फेब्रुवारी महिन्याअखेरीस त्याची फळे पिकू लागली. अनेक वैदू आणि गावठी औषध देणारी लोक या झाडांचा शोध घेऊ लागतात आणि याची पिकलेली लालसर फळे आणि आतील पांढर्‍या वर्णाच्या बिया सुकवून औषधी म्हणून दिली जातात. शास्त्रीय अभ्यासातूनसुद्धा या गृहितकाला पुष्टी मिळालेली आहे. मुख्यतः या झाडाला ज्याच्यामुळे युपस असे नाव पडले ते म्हणजे याच्या विषारी चिकामुळे. बंदुका आणि इतर साधनांचा सर्रास वापर होण्याआधी बाण आणि डार्ट मारून केल्या जाणार्‍या शिकारीसाठी बाणाच्या टोकाला या झाडाचा चीक लावला जाई. बाण शरीरात रूतला की सावज तात्पुरत्या स्वरूपात लकवाग्रस्त होऊन पडले की मग पकडले जाई. त्यामुळेच अगदी पुरातन काळापासून या वृक्षाचे महत्त्व ओळखून देव रहाटीत एखाद दुसरे का होईना पण चांदफळ आजही दिमाखाने उभे असलेले दिसते.

दुर्दैवाने इतका कल्पवृक्ष असूनही याचा प्रचार आणि प्रसार मात्र अभावानेच झालेला आढळतो. अनेक प्राणी, पक्षी याची फळे खात नाहीत. झाडाखाली पिकून पडणारी फळे या वृक्षांच्या विशाल सावलीतजमिनीवर जिथे उन्हाचा कवडसासुद्धा पोहोचणार नाही, अशा ठिकाणी पडून राहतात. रानकोंबडे, सांबर, साळींदर यांच्या तावडीतून सुटून रायलेली फळे सुकून किंवा कुजून जातात. मग यांचा प्रसार तरी कसा होत असेल या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतात. फेब्रुवारी, मार्च महिन्यात जेव्हा याची फळे पिकू लागतात त्यावेळी एखाद्या झाडाखाली निवांत बसावे, वाटल्यास थोडी डुलकी घ्यावी, तुमची झोपमोड होईल ती एखाद्या चेटकिणीचे वाटावे, अशा चिडवून दाखवणाऱ्या हास्याने. एकट्या दुकट्याला घाबरवून टाकणारे हे हास्य आहे मलबारी राखी धनेशचे. लालसर कट्यारीसारखी वाकडी चोच आणि राखी रंगाचे हे धनेश पक्षी सह्याद्रीच्या उंचीवरील जंगलात आढळतात.

मलबारी राखी धनेश आणि महाधनेश यांनी चांदफळाची फळे खाऊन ती सहजरित्या पचवण्याची क्षमता वर्षानुवर्षांच्या तपश्चर्येतून निर्माण केली आहे. चांदफळालासुद्धा धनेशाचा सहवास आवडत असावा. धनेशांच्या पोटातून जाऊन यांची फळे बिजाच्या स्वरूपात विष्ठेतून लांबपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या वास्तव्याच्या आणि फळे शोधण्याच्या सीमा वाढवतात. वात्सल्याने भरपूर आणि मायेने काठोकाट भरलेल्या धनेशाच्या नराच्या गळ्यातूनमादीपर्यंत पोहोचलेली आणि झाडाखाली पडून मातीतून रुजून आलेली चांदफळाची रोपे धनेशाच्या ढोलीची ओळख पटवून देतात. संख्येने अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे परंतु आपल्या फक्त आकारानेच नव्हे, तर पर्यावरणीय कार्याने महत्तम असणारे हे मानवी इतिहासाचे साक्षीदार काळाच्या पडद्याआड जाऊ नये म्हणून विशेष प्रयत्न करायलाच हवे. देवराईचे देवपण जस मंदिरातील देवाच्या पायाशी आहे तसे ते या पुराणवृक्ष्याच्या छायेतही आहे. या वृक्षांची आशीर्वादरुपी छाया आयुष्यभर आपल्या डोक्यावर राहावी, हीच काय ती प्रार्थना.

- प्रतिक मोरे