आंबोलीतील 'ब्लॅक पॅंथर' कॅमेऱ्यात कैद; 'या' विद्यार्थ्यांना झाले दर्शन

26 Feb 2024 10:50:34
black panther amboli


मुंबई (अक्षय मांडवकर) : आंबोलीत काळ्या बिबट्याचे म्हणजेच ब्लॅक पॅंथरचे ( black panther ) पुन्हा एकदा दर्शन झाले आहे. मात्र, यावेळीस हा प्राणी कॅमेऱ्यात कैद झाला आहे ( black panther ). मुंबईतील रुपारेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आंबोलीतील शैक्षणिक सहलीदरम्यान या प्राण्याचे दर्शन झाले. ( black panther )
 
आंबोली हे सांवतवाडी तालुक्यातील गाव असून ते ५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्रावर पसरलेले आहे. उत्तर आणि मध्य पश्चिम घाटाला जोडणारा हा भाग आहे. त्यामुळे याठिकाणी दक्षिण भारतातील प्रजाती मोठ्या संख्येन सापडतात. आंबोली-चौकुळ या एवढ्या छोट्याशा भागामधून २००५ पासून २३ नव्या प्रजातींचा शोध लागला आहे. त्यामधील जवळपास सात प्रजाती या प्रदेशनिष्ठ आहेत. जैवविविधतेने समृद्ध असणाऱ्या या प्रदेशात ब्लॅक पॅंथरचे अस्तित्व असण्यावर यापूर्वी देखील शिक्कामोर्तब झाले आहे. २०१४ साली आजऱ्यामध्ये काळ्या बिबट्याची नोंद झाली होती. तसेच २०१६ मध्ये तिलारीमधूनही काळ्या बिबट्याची नोंद करण्यात आली आहे. २४ आॅगस्ट, २०२३ रोजी कोल्हापूरचे रहिवासी मिलिंद गडकरी यांना देखील आंबोलीत काळ्या बिबट्याचे दर्शन झाले होते. मात्र, आता या प्राण्याला कॅमेऱ्यात कैद करण्यात यश मिळाले आहे.
 

मुंबईतील रुपारेल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना २३ फेब्रुवारी रोजी आंबोलीत काळ्या बिबट्याचे दर्शन झाले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीदरम्यान त्यांना हा प्राणी दिसला. यावेळी विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख नितीन वासनिक, प्राध्यापक सागर गवस, ऋुचा साठे आणि आंबोलीतील स्थानिक रोहन कोरगावकर आणि कौस्तुभ कोरगावकर, हिमानी जोशी होते. काळ्या बिबट्याचे दर्शन झाल्यावर लागलीच त्याचे छायाचित्र त्यांनी कॅमेऱ्यात कैद केले. काळा बिबट्या हा सामान्य बिबट्यांसारखाच असतो मात्र त्यात मेलानिनचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्वचेचा रंग काळा झालेला पहायला मिळतो.  मेलानिस्टीक बिबटे साधारणतः घनदाट जंगलांमध्ये आढळतात.
 
Powered By Sangraha 9.0