धक्कादायक! ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाला आखाती देशांमध्ये बंदी

26 Feb 2024 11:23:28

article 370 
 
मुंबई : जम्मू- काश्मिरमधून स्वातंत्र्यानंतर जवळपास ७५ वर्षांनी ‘कलम ३७०’ हटवण्यात मोदी सरकार यशस्वी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचा संपुर्ण इतिहास आदित्य जांभळे दिग्दर्शित आणि आदित्य धर निर्मित ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. मात्र, एक धक्कादायक बाब अशी ही ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट आखाती देशांमध्ये दाखवण्यास मनाई करण्यात आली आहे. एका महत्वाच्या आणि राजकीय दृष्ट्या महत्वपुर्ण असणाऱ्या या विषयावरील चित्रपटाला हा मोठा धक्का आहे.
 
दरम्यान, आखाती देशांमध्ये हिंदी चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याची ही पहिली घटना नाही. यापुर्वी प्रदर्शित झालेल्या फायटर चित्रपटाला देखील आखाती देशांमध्ये बंद करण्यात आली होती. बरेच हिंदी कलाकार आखाती देशामंध्ये चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी जात असतातच, मात्र, त्यांच्याच चित्रपटांना प्रदर्शित न करु देणे हा हिंदी चित्रपटसृष्टीवर मोठा अन्याय आहे असेच म्हणावे लागेल.
 
२३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाने पहिल्यादिवशी ६.१२ कोटी, दुसऱ्या दिवशी ९.०८ कोटी कमवत आत्तापर्यंत १५.२० कोटी रुपयांची बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. आखाती देश वगळता ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, यु.के, यु.एस.ए या देशांत या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे.
 
दरम्यान, ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटात यामी गौतमसह, प्रिया मणि, वैभव तत्ववादी, अरुण गोविल, किरण करमरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदित्य जांभळे यांनी केले असून ज्योती देशपांडे आणि आदित्य धर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0