दिसपूर : "काँग्रेसवाल्यांनो ऐका, जोपर्यंत मी हिमंता बिस्वा सरमा जिवंत आहे, तोपर्यंत आसाममध्ये लहान मुलींचे लग्न होऊ देणार नाही. मुस्लिम समाजाच्या मुलींना उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही लोकांनी उघडलेले दुकान आम्ही पूर्णपणे बंद केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही." असे वक्तव्य आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना केले.
सरमा आसामच्या विधानसभेत बोलत होते. रविवारी, दि. २६ फेब्रुवारी २०२४ ला आसाम सरकारने मुस्लिम विवाह घटस्फोट नोंदणी कायदा रद्द केला. या कायद्याद्वारे मुस्लीम मुलींचा बालविवाह केला जात होता, असा दावा आसाम सरकारने केला आहे. विधानसभेत बोलताना आसामच्या मुख्यमंत्र्यांनी २०२६ पर्यंत राज्यातील बालविवाह बंद होतील, असा दावा केला आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पुन्हा एकदा २०२६ पर्यंत राज्यातून बालविवाह पूर्णपणे काढून टाकण्याचे वचन दिले आहे. सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांवर निशाणा साधत ते म्हणाले, "माझे लक्षपूर्वक ऐका, जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत आसाममध्ये बालविवाह होऊ देणार नाही. हिमंता बिस्वा सरमा जिवंत असेपर्यंत ते होऊ देणार नाहीत. हे घडणार आहे. तुमचे दुकान मी २०२६ पर्यंत बंद करेल"
सरमा यांच्यावर काँग्रेस पक्षाने मुस्लीमविरोधी असल्याची टीका केली होती. विरोधकांच्या टीकेवर उत्तर देताना सरमा म्हणाले की, "काही लोक म्हणतात की आम्ही मुस्लिम विरोधी आहोत, परंतु तिहेरी तलाक, बहुपत्नीत्व आणि बालविवाह संपुष्टात आणण्याच्या आमच्या प्रयत्नांमुळे आम्ही कोणत्याही काँग्रेस सरकारपेक्षा मुस्लिम समुदायासाठी जास्त काम केले आहे."