लघुउद्योजिका ‘नीला’

25 Feb 2024 21:06:18
Article on Neela Padhye

आईकडून मिळालेले उद्योजकतेचे बाळकडू घेऊन, स्वत:च्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवणार्‍या, डोंबिवलीकर नीला श्रीकृष्ण पाध्ये यांच्याविषयी...

नीला यांचा जन्म दि. १८ जुलै १९५६ ला वैभववाडी येथे झाला. त्यांचे सर्व बालपण विलेपार्ले येथे गेले. त्यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शिक्षण घेतले. नीला यांच्या आई वासंती यांचा पुरणपोळीचा व्यवसाय होता आणि वडील वसंत अलूरकर हे आयकर विभागात नोकरी करत होते. नीला आईवडील आणि चार भावंडांसह विलेपार्ले येथे राहत होत्या. त्याकाळात आयकर विभागात भरघोस असे वेतन दिले जात नव्हते. नीला यांच्या पाठीमागे एक भाऊ असल्याने, त्यांचे शिक्षण महत्त्वाचे होते. नीला आणि त्यांचा भाऊ दोघांचे शिक्षण करणे झेपणारे नव्हते. त्यामुळे नीला यांना दहावीनंतर अपरिहार्यतेने शिक्षणाला पुर्णविराम द्याला लागला. वडिलांना दोघांचे शिक्षण करणे शक्य नव्हते. मग नीला दहावीनंतर लगेचच नोकरीकडे वळल्या. सुरुवातीला टायपिस्ट म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानंतर ’एक्सपोर्ट’मध्ये सीएसटीला एक नोकरीची संधी त्यांच्यासाठी चालून आली. त्या ठिकाणी त्यांनी सात वर्षे काम केले. हे काम करत असतानाच, आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
 
सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत महाविद्यालय आणि महाविद्यालयातून बाहेर पडून, मग ५ वाजेपर्यंत नोकरी असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. दहावीनंतर चार वर्षांच्या गॅपनंतर त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. ’बीए’ची पदवी त्यांनी संपादन केली. या काळात त्यांचे श्रीकृष्ण पाध्ये यांच्याशी लग्न जुळाले. १९७९ साली त्या विवाहबद्ध झाल्या आणि डोंबिवलीत राहायला आल्या. डोंबिवलीतील पाडुंरंगवाडी येथे त्या राहतात. त्यांचे पती श्रीकृष्ण हे बँकेत नोकरी करत होते. एके दिवशी त्यांच्या मुलीला ताप आला होता. त्यांनी सुट्टी मागितली; पण त्यांची सुट्टी मंजूर करण्यात आली नाही. नोकरीवर हजर राहणे, त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

नीला यांना लहानपणापासूनच उद्योजकतेची आवड होती. उद्योजकतेचे बाळकडू त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळाले होते. नोकरी सोडल्यानंतर, त्यांच्या मनात उद्योग-व्यवसाय करण्याचे विचार घोळू लागले. त्यांनी व्यवसायात पहिले पाऊल टाकले. सुरुवातीला बॅग्स बनविणे येथून त्यांनी आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. सध्या त्यांच्याकडे कापडापासून बनविलेल्या पर्स आणि छत्रीसाठी वापरण्यात येणारे कापड त्यापासून बनविलेल्या पर्स त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. ’कोविड’काळात बॅग्सची मागणी कमी झाली. त्यामुळे नीला यांनी मण्यापासून वस्तू बनविण्यास सुरुवात केली. लग्नापूर्वी या वस्तू त्या बनवत होत्या. त्या कलाकसुरीचा त्यांना ’कोविड’काळात चांगलाच उपयोग झाला. मण्यापासून विविध प्रकारच्या वस्तूही त्या तयार करतात. त्यामध्ये १०० ते १५० प्रकार त्यांच्याकडे उपलब्ध आहे. समई भोवतीची रांगोळी, तुळशी वृंदावन, रूखवातच्या वस्तू, गुढीपाडव्यासाठी लागणार्‍या गुढी अशा विविध वस्तूंचा त्यात समावेश आहे.

सणवारानुसार त्यांच्या वस्तूंना कमी जास्त मागणी असते. जसे की गणेशोत्सवात सजावटीच्या वस्तू, लग्नाचा हंगाम असेल, तेव्हा रुखवाताच्या वस्तू, पर्स यांना मागणी असते. गुढीपाडव्याच्या वेळी गुढीला विशेष मागणी असते. नीला यांनी व्यवसायात येण्यापूर्वी एक सरकारी प्रशिक्षण कोर्स ही पूर्ण केला होता. पण, त्या कोर्सपेक्षा ही त्या स्वतःच स्वतःला विकसित करीत गेल्या. चार आठवड्यांचा तो अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला होता. व्यवसाय सुरू केला, तेव्हा नीला इच्छुकांना प्रशिक्षण देण्याचेही काम करीत होत्या. पण, हळूहळू व्यवसायांचा विस्तार वाढू लागला. अनेक ऑडर्स येऊ लागल्या. कुटुंबांची जबाबदारी ही होती. त्यामध्ये प्रशिक्षणाचे काम मागे पडले. आता कौटुंबिक जबाबदारी थोडी कमी झाली आहे. मुलीचे लग्न झाले आहे. त्यामुळे मुलींसाठी प्रशिक्षण वर्ग पुन्हा एकदा सुरू करण्याचा नीला यांचा मानस आहे.

नीला यांना नवनवीन ठिकाणी भेट देणे, फिरायला जाण्याची आवड आहे. त्यांनी नवीन गोष्टी शिकायलाही आवडतात. त्यामुळे नवीन गोष्टी त्या नेहमी आत्मसात करत असतात. नीला या लघुउद्योजिका म्हणून नावारुपाला आल्या असल्या, तरी त्यासाठी त्यांनी कधी ही कोणतीही जाहिरात केली नाही. माऊथ टू माऊथ पब्लिसिटी यावरच त्यांचा व्यवसाय जम धरून आहे. सात ते आठ ग्रुपला त्या जोडलेल्या आहेत. त्या ग्रुपच्या माध्यमातून ही त्यांना व्यवसायासाठी फायदा होतो. ऑर्डर दिल्यानंतर त्याप्रमाणे त्या वस्तू बनवूनदेखील देतात. किती ऑर्डर आहे, त्याप्रमाणे वस्तू बनविण्यासाठी वेळ लागतो. दि. १३ व १४ फेब्रुवारीला सर्वेश सभागृहात एक प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनात नीला यादेखील सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या वस्तू त्यांनी प्रदर्शनात लावल्या होत्या. पण, प्रदर्शनात जाण्याची देखील ही पहिलीच वेळ असल्याचे नीला सांगतात.

नीला यांच्याकडून आतापर्यंत १५ ते २० मुलींनी प्रशिक्षण घेतले आहे. त्या मुलींनी आज स्वतःचा व्यवसायदेखील सुरू केला आहे. नीला यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरूण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0