दादोजी कोंडदेव स्टेडीयममधील गाळेधारकांनी थकवले २ कोटी; पालिकेच्या नोटीसा

23 Feb 2024 19:41:33
dadaji konddev stadium in thane

ठाणे : 
ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडीयमचे रुपडे पालटले असले तरी स्टेडीयममधील व्यावसायिक गाळ्यांमध्ये अनेक संस्था, आस्थापना आणि वृत्तपत्रांच्या कार्यालयांनी ठाण मांडले आहे. या गाळे धारकांनी गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेला भाडेच अदा केले नसल्याचे समोर आले आहे. येथील ४८ गाळे धारकांनी तब्बल २ कोटी ४१ लाख ३ हजार ९८० रुपये थकवले असल्याने पालिका प्रशासनाने सर्वाना थकबाकी भरण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. दरम्यान यापुर्वी देखील पालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने काही थकबाकीदारांचे गाळे सील केले होते.

ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडीयममध्ये एकूण ९८ हून अधिक व्यावसायिक गाळे असुन हे गाळे भाडेतत्वावर देण्यात आले आहेत. या भाड्यापोटी पालिकेला दरवर्षी कोटींचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या काही वर्षापासुन हे भाडे मोठ्या प्रमाणात थकले असुन पालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने त्याबाबत वेळोवेळी नोटीस देवून देखील भाडे वेळेवर भरलेले नसल्याचे समोर आले आहे. काही वर्षांपूर्वी जवळपास १० गाळे सिल करण्यात आले होते.दरम्यान थकीत असलेल्या गाळे धारकांचे मागील वर्षाचे आणि चालू वर्षाचे भाडे थकीत असल्याने नोटिसा बजावल्या आल्या असून त्यांना ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत भाडे न भरल्यास गाळेधारकांवर कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.

Powered By Sangraha 9.0