लंडन : "मी मलाला युसूफझाई कधीच होणार नाही, पण मलालाने माझ्या देशाची, माझ्या मातृभूमीला शोषित म्हणवून बदनाम केल्याबद्दल मला आक्षेप आहे. मी सोशल मीडिया आणि आंतरराष्ट्रीय मीडियाच्या अशा सर्व टूलकिट सदस्यांना आक्षेप घेते ज्यांनी कधीही भारतीय काश्मीरला जाण्याची तसदी घेतली नाही. परंतु काश्मीरच्या बाबतीत भारताला बदनाम करण्याचे काम केले." असा आरोप काश्मिरी कार्यकर्त्या आणि पत्रकार याना मीर यांनी नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई आणि टूलकिट गँगवर केला.
याना मीर या ब्रिटीश संसदेत आयोजित 'संकल्प दिवस' या कार्यक्रमात बोलत होत्या. त्यांनी आपल्या वक्तव्यात पाकिस्तानवर भारताच्या प्रतिष्ठेला कलंकित करण्यासाठी अपप्रचार केल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की, "मला भारतातील काश्मीरमध्ये सुरक्षितपणे राहत आहे, जिथे दहशतवादाच्या धमक्यांमुळे मला आपला देश सोडावा लागणार नाही."
ब्रिटिश संसदेत बोलताना याना मीर यांनी भारतीय लष्कराचे देखील कौतुक केले. त्या म्हणाल्या की, " मला जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षित आणि मोकळे वाटते. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि कायम राहील. कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरचा विकास झाला आहे. काश्मीरमध्ये सध्या शांतता आहे.
याना मीर यांनी आंतरराष्ट्रीय मीडियाला जम्मू-काश्मीरमधील लोकांमध्ये फूट न पाडण्याचा सल्ला दिला आहे. त्या म्हणाल्या की, "मी तुम्हाला विनंती करते की, धर्माच्या आधारे भारतीयांचे ध्रुवीकरण थांबवा. दहशतवादामुळे हजारो काश्मिरी मातांनी आपले पुत्र गमावले आहेत, त्यामुळे आता माझ्या काश्मिरी लोकांना शांततेत जगू द्या."