भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन; वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

23 Feb 2024 12:07:38
 Rajendra Patni
 
मुंबई : वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे दि. २३ फेब्रुवारी २०२४ शुक्रवारी निधन झाले. राजेंद्र पाटणी यांनी ५९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अनेक दिवसांपासून ते आजाराशी झुंज देत होते. परंतु मुंबई येथे सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. राजेंद्र पाटणींच्या निधनाने भाजपसह राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला आहे.
 
राजेंद्र पाटणी यांच्या निधनावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, "अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ॐ शांती "
 
 
Powered By Sangraha 9.0