ठाण्यातील गोएंका शाळेच्या विद्यार्थिनीसोबत नराधमाचे विकृत चाळे

22 Feb 2024 09:25:40
Goenka school in thane city

ठाणे :
ठाण्यातील नामांकित सी.पी. गोएंका या शाळेतून मंगळवारी सहलीला गेलेल्या शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, पालकांचा उद्रेक झाल्यानंतर खाजगी बसचा अटेंडन्ट जावेद मोहम्मद नवी खान या नराधमा विरोधात ३५४, ३५४ अ , ५०९ सह (पोक्सो) लैगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम,२०१२ चे कलम ८, १२ प्रमाणे बुधवारी (दि.२१) रोजी गुन्हा दाखल करून अटक केली. न्यायालयाने त्याला २४ फेब्रु.पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे शालेय विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने पालकांनी शाळेवर धडक मारून जाब विचारला. तसेच जोपर्यंत शाळेच्या ट्रस्टी, सीईओ आणि शिक्षिका यांना बडतर्फ केले जात नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्धार केला. त्यानंतर सुरुवातीला नामानिराळे राहणाऱ्या शाळा व्यवस्थापनाने सायंकाळी तीन शिक्षिकांना बडतर्फ केले. दरम्यान, पालकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे.
 
घोडबंदर रोड भाईंदरपाडा, येथे राहणाऱ्या पालकांच्या तक्रारीनंतर ही गंभीर बाब समोर आली आहे. ठाण्यातील कापुरबावडी नाका, हायस्ट्रीट मॉल सी.पी.गोएंका इंटरनॅशनल स्कुलची पिकनिक मंगळवारी अडव्हेंचर टूर्स अँड ट्रॅव्हलर्स कंपनीच्या खाजगी बसने घाटकोपर येथील थीम पार्कमध्ये गेली होती. सहलीसाठी बसमध्ये दुसरी आणि तिसरी इयत्तेतील २५ विद्यार्थी आणि तीन शिक्षिका होत्या.या बसचा अटेंडन्ट जावेद खान रा. गोरेगाव (प) मुंबई याने प्रवासात मुलांमुलींना खाण्यासाठी पदार्थ देताना चिमुकल्या विद्यार्थ्यासोबत विकृत चाळे केले. आठ मुली आणि एक मुलासोबत हा विकृत प्रकार घडल्याचे पालकांनी सांगितले.संध्याकाळी साडेसात च्या सुमारास ज्यावेळी बस ठाण्यात परतली तेव्हा काही मुली रडतच बसच्या बाहेर पडल्या. पालकांना बिलगुन रडताना दोन चिमुकलींनी ही बाब सांगितली. त्यानंतर शाळेच्या व्हॉटस ॲप ग्रुपमध्ये हा
 
मेसेज टाकला. त्यावर शाळेच्या शिक्षिकेने आधी असे काही घडलेच नसल्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर रात्रीच पालक पुन्हा शाळेत आले आणि उद्रेक झाला. मध्यरात्री ३ वाजेपर्यत पालक शाळेत थांबले होते.नंतर शाळा प्रशासनाला जाब विचारल्यानंतर पालकांचा संताप पाहुन कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाय. एस. आव्हाड यांनी शाळेला भेट देत पालकांची समजूत काढली. त्यानंतर पालकांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात बस अटेंडन्ट विरोधात गुन्हा दाखल केल्याने पोलिसांनी जावेद खान या नराधमाला अटक केली.
 
दरम्यान, शाळेचे ट्रस्टी परेश ठक्कर यांनी दै. मुंबई तरूण भारत शी बोलताना या घटनेबद्दल खेद व्यक्त करून दुर्लक्ष्य झाल्याची कबुली दिली. आमचीही मुले याच शाळेत शिकतात तेव्हा आम्ही सदैव पालकांसोबत आहोत. याबाबत प्राचार्या, संस्थेचे सीईओ यांनाही जाब विचारला असुन तीन शिक्षिकांना बडतर्फ केल्याचे त्यांनी सांगितले.

सहलीसाठी शाळेची बस असल्याचे सांगुन खाजगी बसमध्ये सहल नेली. या बसमध्ये सीसी टिव्ही नव्हते, शाळेच्या मावशीही पाठवल्या नव्हत्या. तीन शिक्षिका आणि पुरुष मदतनीस बसमध्ये हेते. आठ ते नऊ विद्यार्थासोबत गैरवर्तन झाले आहे. शिक्षिका तर काहीच माहित नसल्याचे सांगत असल्याने शाळेचा हा बेजबाबदारपणा असल्याची प्रतिक्रिया पालकांनी दिली.

शाळेने अशा लोकांना कामे देताना चारित्र्य पडताळणी केली पाहिजे.यापूर्वी मनविसे च्या मागणी नंतर पोलीस आयुक्तांनी शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी यांना चारित्र्य पडताळणी करणे बंधनकारक केले होते. मुलांची सुरक्षा हि पूर्णपणे जबाबदारी शाळेची आहे. संस्थाचालक व मुख्याध्यापक यांच्यावर देखील निष्काळजीपणा केला यासाठी गुन्हा दाखल झालाच पाहिजे.
- संदीप पाचंगे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी
 
गोएंका शाळेत घडलेल्या प्रकाराबाबत शिक्षण विभागालाही कळवले असुन पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनीही दखल घेतली आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पोलीस कोठडी दरम्यान चौकशीत अन्य बाबी समोर येतील.
- संजय निंबाळकर, सहा. पोलीस निरिक्षक
Powered By Sangraha 9.0