सरकारकडून शेतकरी संघटनांना चर्चेचा प्रस्ताव; कृषीमंत्री म्हणाले, एमएसपी, एफआयआर.....!

21 Feb 2024 16:46:53
farmers-protest-government-calls-for-fifth-round-talk

नवी दिल्ली : 
  शेतकरी संघटना व केंद्र सरकार यांच्यात किमान आधारभूत किंमत(एमएसपी) संदर्भात गेल्या काही दिवसांपासून ४ वेळा बैठक आयोजित करण्यात आली. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर एमएसपीसाठी आंदोलन तीव्र केले आहे. केद्रीय कृषी मंत्री अर्जून मुंडा यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटना यांच्यासोबत बैठकीच्या चार फेरी पार पडल्या तरीदेखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघू शकलेला नाही. केंद्र सरकारच्या शिफारशी शेतकरी संघटनांकडून फेटाळण्यात आल्या आहेत.



दरम्यान, या सर्वप्रकरणी आता केंद्र सरकारने पाचवी फेरी बोलावली असून या बैठकीस शेतकरी संघटनांकडून अद्याप प्रतिसाद मिळलेला नाही. याआधीच चौथ्या फेरीचा प्रस्ताव आंदोलकांनी फेटाळला होता. तसेच, केंद्र सरकारकडून याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेच्या पाचव्या फेरीसाठी बोलावले आहे. सरकारला या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढायचा आहे, असे केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटले आहे.


केंद्रीय कृषीमंत्री अर्जून मुंडा यांनी 'X'वर पोस्ट केली असून ते म्हणाले, केंद्र सरकार पाचव्या फेरीत एमएसपी मागणी, पीक विविधीकरण, पराली समस्या, एफआयआर अशा सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. मी पुन्हा शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रित करतो. तसेच, या सर्व पार्श्वभूमीवर शांतता राखणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, असेही कृषीमंत्री मुंडा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले, “चौथ्या फेरीच्या चर्चेनंतर शेतकरी संघटनांकडून आलेल्या अभिप्रायांची दखल घेऊन आम्ही पुन्हा पाचव्या फेरीची बैठक घेणार आहोत आणि त्या बैठकीत आम्ही अशा सर्व मुद्द्यांवर चर्चा करू ज्यावर आपण सर्व मिळून तोडगा काढू शकतो.”, असा विश्वास कृषीमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, मी एवढीच विनंती करेन की, सर्वांनी अशा प्रश्नांवर शांततेने चर्चा करून तोडगा काढण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी शांतता राखावी, असे आवाहन असून त्यांच्याशी संवादासाठी सरकार नेहमी प्रयत्न करत आहे. जेव्हा आपण चर्चा करतो, तेव्हा परस्पर सौहार्दपूर्ण वातावरणात उपाय निघतात, असेही अर्जून मुंडा यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0