घरकुल योजनांच्या कामांना गती द्या!, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचे निर्देश

21 Feb 2024 18:52:04
cabinet minister atul save

मुंबई : 
प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजना राबविण्यात येतात. मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व अहिल्याबाई होळकर धनगर वस्ती योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना घरकुल मिळाली पाहिजेत. यासाठी या योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या घरकुलांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले.

मंत्री सावे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व अहिल्याबाई होळकर धनगर वस्ती योजना या घरकुल योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक डॉ. राजाराम दिघे, उपसचिव दिनेश चव्हाण तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सावे म्हणाले, राज्यात केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. पात्र लाभार्थ्यांची केंद्र सरकारच्या आवास सॉफ्ट या संगणक प्रणालीमध्ये नोंदणी करावी. या सर्व योजनेतील प्रलंबित व अपूर्ण असलेली घरबांधणी कामे तातडीने पूर्ण करावीत. इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत येत्या तीन वर्षांत १० लाख घरे बांधण्यात येणार आहेत. त्यामध्ये या वर्षी पात्र लाभार्थ्यांना तीन लाख घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. या लाभार्थ्यांना वेळेत घरकुल मिळण्यासाठी व दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
Powered By Sangraha 9.0