मुंबई : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा आई-बाबा झाले आहेत. १५ फेब्रुवारी रोजी अनुष्काने गोंडस मुलाला जन्म दिला. गेल्या काही दिवसांपासून अनुष्का पुन्हा एकदा गरोदर असल्याची चर्चा सुरुच होती. आता त्या चर्चेला पुर्णविराम लागला असून स्वत: विराट आणि अनुष्का यांनी त्यांच्या सोशल मिडियावरुन त्यांना मुलगा झाल्याचे आणि त्याचे नाव ‘अकाय’ ठेवल्याचे सांगितले आहे. कलाकार आपल्या मुलांची नावं फार अर्थपुर्ण ठेवतात. अकाय हा नावाचा अर्थ देखील तितकाच महत्वपुर्ण आहे.
'अकाय'चा अर्थ काय?
‘अकाय’ या नावाचे विविध अर्थ आहेत. अकाय नावाचा एक अर्थ हा चंद्राचा प्रकाश असा होतो. एकंदरीतच विरुष्काचं आयुष्य प्रकाशमय करणारा 'अकाय' असे आपण नक्कीच म्हणू शकतो. याचा आणखी एक अर्थ म्हणजे शरीरहीन. ज्या व्यक्तीला शरीर नाही किंवा जो शरीरविरहित आहे, त्याला अकाय म्हणतात. याशिवाय अकाय शब्दाचा अजून एक अर्थ म्हणजे आकार किंवा स्वरूप नसलेले म्हणजेच निराकार. अकाय हे नाव इंग्रजीत लिहिले असता ६ अक्षर होतात. सांख्यिक अर्थानुसार ६ अंक संतुलन, सुसंवाद आणि जबाबदारी यांचे प्रतिनिधित्व करते.
वामिकाचा अर्थ काय?
विराट-अनुष्काने आपल्या पहिल्या मुलीचे नाव 'वामिका' असे ठेवले आहे. वामिका हे नाव विराट आणि अनुष्का या दोन नावांचे एकत्रिकरण आहे. तसेच या नावाचा आणखी एक अर्थ संस्कृतमध्ये 'देवी दुर्गा' असा होतो.
काय लिहिले विरुष्काने त्यांच्या पोस्टमध्ये?
विराट-अनुष्का पोस्ट शेअर करत लिहितात, “तुम्हा सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की, १५ फेब्रुवारीला आमच्या घरी चिमुकल्या ‘अकाय’चं आणि वामिकाच्या लहान भावाचं आगमन झालं. आयुष्यातील या सर्वात सुंदर प्रसंगी तुमचे आशीर्वाद व शुभेच्छा आमच्याबरोबर कायम असूद्या. याशिवाय आमच्या प्रायव्हसीचा आदर करा ही विनंती.”
दरम्यान, अनुष्का शर्माने २०२१ मध्ये लेक वामिकाला जन्म दिला होता. लेकीच्या जन्मानंतर अभिनेत्रीने कलाविश्वातून ब्रेक घेतला होता. ती शेवटची २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ चित्रपटात झळकली होती. आता लवकरच अभिनेत्री ‘चकदा एक्स्प्रेस’ या बायोपिक चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी गोलंदाज झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित आहे.