राज्यातील १०० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू होणार

21 Feb 2024 19:08:50
Pramod Mahajan Skill and Entrepreneurship Development Campaign

मुंबई :
  राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान’ योजनेच्या धर्तीवर राज्यातील १०० महाविद्यालयांमध्ये येत्या ४ मार्चपासून कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी यांनी दिली.

एल्फिन्स्टंट तांत्रिक विद्यालय येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या वतीने आयोजित कौशल्य विकास कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अत्तिरिक आयुक्त अनिल सोनवणे, राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाचे अधिकारी गौरव दिमान यासह विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

निधी चौधरी म्हणाल्या की, कौशल्य विकास या संकल्पनेचा लाभ व्हावा, यासाठी राज्यातील ३ हजार ५०० हून अधिक महाविद्यालयांकडून कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याबाबत माहिती मागविण्यात आलेली आहे. कार्यशाळेतून कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रांची नोंदणी, कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी सुसंगत अभ्यासक्रम निवडणे, महास्वयंम पोर्टल वर माहिती भरणे यासह सर्व माहिती या प्रशिक्षणामध्ये दिली जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते ऑन जॉब ट्रेनिंग पर्यंत कौशल्य विकास विभागाने एक आदर्श कार्यपद्धती तयार केली आहे. जास्तीत जास्त महाविद्यालयाने कौशल्य विकास केंद्र सुरू करणे या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

ग्रामीण भागात ५०० कौशल्य विकास केंद्र

रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी निर्माण व्हाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर कमी करण्यासाठी तसेच स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी ग्रामीण भागात ५०० कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेअंतर्गत १०१ केंद्रांचा आरंभ करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय रोजगार मिळावे आणि आता विभागस्तरीय होत असलेले रोजगार मिळावे यातून जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जात आहेत. कुशल कामगारांचे कौशल्य अधिक विकसित करणे. विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देणे यासाठी विभाग प्रयत्नशील असल्याचे निधी चौधरी यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0