मविआत बिघाडी?

    21-Feb-2024
Total Views |
MVA in maharashtra politics alliance

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हॅट्ट्रिकपासून लांब ठेवण्यासाठी तयार झालेली ’इंडी’ आघाडी अस्थिपंजर झाली. दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडीची वाटचालही त्याच दिशेने सुरू दिसते. गेल्या काही दिवसांत बसलेले जबरदस्त धक्केच त्याला कारणीभूत. काँग्रेसचे निष्ठावंत सरदार एकेक करून साथ सोडू लागल्यामुळे गळते छप्पर शिवताना मविआची तारांबळ उडत आहे. त्यात, ठाकरेंचे तीन आणि मोठ्या पवारांच्या मर्जीतील दोन मातब्बर नेते महायुतीच्या गळाला लागल्यामुळे ते बेचैन आहेत. आठवडाभरात जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्याचे 2 फेब्रुवारीच्या बैठकीत मविआच्या नेत्यांनी ठरवले खरे. परंतु, गेल्या 20 दिवसांत एकही बैठक झाली नाही. आघाडीतील तीन मोठ्या पक्षांपैकी काँग्रेस हा एकमेव फुटीपासून लांब असल्यामुळे ठाकरे आणि पवारांच्या तुलनेत त्यांची ’बार्गेनिंग पॉवर’ अधिक होती. मात्र, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी साथ सोडल्यामुळे काँग्रेस पूर्णतः बॅकफूटवर आली. चव्हाण हे जागावाटपातील चर्चेत सुरुवातीपासून अग्रभागी होते; किंबहुना मविआत निर्णायक भूमिका निभावत होते. त्यामुळे त्यांच्याकडे 48 लोकसभा क्षेत्रातील मविआची बलस्थाने आणि उणिवांची संपूर्ण माहिती आहे. या सगळ्या गुपितांसह ते महायुतीत सहभागी झाले. परिणामी, जागावाटपाचे सूत्र अंतिम होण्याआधीच सगळा ’डेटा’ विरोधकांच्या हाती लागल्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. आजही लोकसभेच्या 16 जागा अशा आहेत, जेथे महाविकास आघाडीला तुल्यबळ उमेदवार सापडलेला नाही. काँग्रेस-पवार गटाची ताकद क्षीण आणि ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येण्याची शाश्वती नसल्यामुळे पेच निर्माण झाला. अशावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या मदतीने समीकरणे बदलवण्याची त्यांची रणनीती आहे. परंतु, आंबेडकरांचे अद्याप तळ्यात-मळ्यात. मात्र, वंचितला वेगळ्या जागा न देता, ठाकरे गटाच्या कोट्यातून त्यांची बोळवण करावी, असा काँग्रेसचा सूर असल्याने त्याला प्रकाश आंबेडकर राजी होतील, असे सध्याचे चित्र नाही. त्यामुळे येत्या काळात जागा वाटपाचा तिढा सुटण्याऐवजी महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता अधिक आहे. तसे झाले तर जे ‘इंडी’चे झाले तेच मविआचे व्हायला आता फार वेळ लागणार नाही, हेच खरे!

ठाकरेंचे ‘एकला चलो रे’?
 
लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे भाजपकडून तळागाळातील मतदारांना साद घातली जात असताना, महाविकास आघाडीचे जागावाटपाचे घोडे पुढे सरकण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे चिंतीत झालेल्या उद्धव ठाकरेंनी नव्या हितचिंतकांना (काँग्रेस आणि मोठे पवार) न सांगताच 18 जागांवर प्रचाराला सुरुवात केली. विदर्भ, मराठवाड्यासह, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यातील 18 लोकसभा मतदारसंघांत त्यांनी परस्पर समन्वयकांची नियुक्तीही जाहीर करुन टाकली. त्यामुळे ठाकरे स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत की काय, असा प्रश्न मविआतील मुख्य नेत्यांना सतावतो आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या साथीने शिवसेनेने 23 जागांवर निवडणुका लढविल्या आणि त्यातील 18 जागा जिंकल्या. 18 पैकी 13 खासदार आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरे सध्या पाच खासदारांच्या पक्षाचे मालक राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी 18 जागांचा हट्ट करू नये, असे काँग्रेसचे म्हणणे. मात्र, खासदार गेले तरी स्थानिक मतदार आणि शिवसैनिक आमच्यासोबत असल्याचा दावा करीत, ठाकरेंकडून अधिकाधिक जागांची मागणी केली गेली. त्यामुळेच जागावाटपाचे सूत्र अद्याप निश्चित होऊ शकलेले नाही, असे काँग्रसचे नेते खासगीत सांगतात, तर जिंकण्याची क्षमता नसलेले मतदारसंघ काँग्रेस मागत असल्यामुळे घटक पक्ष नाराज असल्याचा सूर ठाकरेंच्या गोटातून आळवला जात आहे.
त्यामुळे ’लग्न होण्याआधीच घटस्फोटा’ची शक्यता गृहीत धरून, उद्धव ठाकरेंनी 18 जागांवर प्रचाराला सुरुवात केली. गेल्या काही दिवसांत ‘मातोश्री’वर त्यांनी मतदारसंघनिहाय संभाव्य उमेदवारांची बैठक घेतली. काही ठिकाणचे उमेदवारही ठरवले. त्यात भर म्हणजे, प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरेंना मविआत न जाता वंचितच्या साथीने स्वबळावर निवडणुका लढवण्याचा प्रस्ताव दिला. 60:40चा हा फॉर्म्युला असून, बाळासाहेबांप्रमाणे शिवशक्ती-भिमशक्तीचा प्रयोग पुन्हा करण्याचे त्यात नमूद केले आहे. हे नवे समीकरण आकाराला आल्यास, त्याचा महायुतीला फटका न बसता, काँग्रेस-राष्ट्रवादी राज्यातून हद्दपार होईल, हे निश्चित!

सुहास शेलार