'श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ' स्पर्धेचा २१ तारखेला समारोप!

20 Feb 2024 17:53:28

Lodha


मुंबई :
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पेनेतून शिवकालीन खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत दिनांक २६ जानेवारी २०२४ पासून मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी पारंपरिक क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या सर्व स्पर्धांचे अंतिम सामने २१ फेब्रुवारी रोजी होणार असून त्या संदर्भात मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेदरम्यान प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
 
याबाबत अधिक माहिती देताना मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, "बुधवार दि. २१ फेब्रुवारी २०२४ रोजी मल्लखांब, मल्लयुद्ध, लेझीम, लंगडी, रस्सीखेच, कबड्डी, पंजा लढवणे आणि ढोल ताशा या क्रीडा आणि कला प्रकारांचे अंतिम सामने मालवणी येथील 'क्रीडा भारती मैदान' येथे संपन्न होणार आहेत. स्पर्धेच्या सांगता सोहळ्याला मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोड, 'क्रीडा भारती'चे राष्ट्रीय संघटन मंत्री प्रसाद महानकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 
सांगता सोहळ्या दरम्यान बुधवारी दुपारी १ वाजता अंतिम सामन्यांना सुरुवात होईल. तर सामन्यांच्या नंतर सायंकाळी ५ ते ६ या वेळेत मुख्य समारंभ व स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न होईल. पुरस्कार वितरण समारंभानंतर सायंकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध संगीतकार व गायक नंदेश उमप हे प्रेरणादायी पोवाडे सादर करतील, अशी माहितीही पत्रकार परिषदेदरम्यान देण्यात आली असून मुंबईकर नागरिकांनी अंतिम फेरीतील सामान्यांचा आवर्जून आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.



Powered By Sangraha 9.0