‘लेट्स इमॅजिन टुगेदर फाऊंडेशन’च्या माध्यमातून वनवासी पाड्यातील तसेच दुर्गम गावखेड्यातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्य केले जाते. खारीचा वाटाच तो! यादरम्यान आलेल्या अनुभवांचे हे शब्दचित्रण...
रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला सांग ना गं आई कुणी पाह्यलंय त्या देवाला...
वरईची मुलं तन्मयतेने एकसुरात गाणं म्हणत होती. आनंदी सोहळ्याच्या निमित्ताने वरईची मुलं मोज शाळेत आली होती. त्यांच्यातला आत्मविश्वास, आनंद ओसंडून वाहत होता. त्यांना पाहून मनात आलं की, हीच का ती मुलं ज्यांना आपण तीन-चार महिन्यांपूर्वी पाहिलं होतं. अशक्त, लाजरीबुजरी, कावरीबावरी...
गेल्या जुलैमध्ये आम्ही वरई बुद्रुकला भेट दिली. तेव्हा या रानावनातील शाळेच्या गोष्टी ऐकून मन हेलावून गेले आणि आमच्यासोबत आलेल्या सर्वच पाहुण्यांनी ठरवले की, यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे. मग त्या मुलांसाठी सर्वप्रथम अधिक पौष्टिक आहार सुरू केला. राजगिरा चिक्की, दाणे, शेंगदाणे आणि खजूर. मग ’लेट्स इमॅजिन’ची टीम लागली कामाला. सोबत वरई बुद्रुकचे गुरुजी आणि पालकही होते.
गेल्या तीन-चार वर्षांचा अनुभव असा की, साधारण दिवाळीनंतर काही मुले आपल्या पालकांसोबत जवळपास सहा महिने स्थलांतरित होतात. त्यामुळे त्यांची शाळा सुटते आणि परत जूनमध्ये शाळेत आल्यावर नव्याने सुरुवात. त्यांचं शिक्षण थांबू नये, असे मात्र मनापासून वाटत होते. गुरुजी, पालक आणि आम्ही एकत्र जमून यावर काही उपाय आहे का, त्याचा विचार केला. पालकांनी सांगितले, ’आमच्या मुलांचा जेवणाचा प्रश्न सोडवला, तर ती गावातील नातेवाईकांकडे तरी राहतील.’ आमच्यासाठी हे एक मोठे आव्हान होते.
कारण, आजपर्यंत आम्ही मुलांसाठी निरनिराळे उपक्रम करत होतो आणि आता या नऊ-दहा मुलांची जबाबदारी आणि खाण्याचा प्रश्न सहा महिन्यांसाठी सोडवायचा होता, पूर्वतयारी पक्की हवी. मग एका मुलाचा एक वेळेचा एक दिवसाचा जेवणाचा खर्च किती?? त्याप्रमाणे गणित करून एक आठवड्याचा किती, महिन्याचा किती आणि सहा महिन्यांचा किती? असा सगळ्यांचा अभ्यास करून वरईच्या गुरुजींनी एक एक्सेल शीट बनवली. त्यात डाळ, तांदूळ, भाजीपासून तिखट, मीठ, तेल या सर्व बारीकसारीक गोष्टींची (प्रत्येक मुलास अंदाजे किती ग्रॅम, मिलीग्रॅम लागेल) तपशीलवार माहिती त्या एक्सेल शीटमध्ये गुरुजींनी दिली. मुलांसाठी काहीतरी करायची मनापासून इच्छा असली की वेळ आणि मार्गही सापडतो. या सगळ्या उपक्रमासाठी लागणारी माहिती गोळा झाली आणि मग सोशल मीडियावर पोस्ट टाकून यासाठी आवाहन केले. कोणी एक दिवसाचा खर्च, कोणी आठवड्याभराचा खर्च, तर कोणी महिना, सहा महिन्यांचा एका मुलाचा खर्च देणगी स्वरूपात दिला.
आता पुढचे आव्हान होते त्यांचे जेवण बनविणे, वेळेवर पोहोचविणे वगैरे. त्यासाठी मोजचे संतोष पटारे आणि सारिका पटारे यांनी जबाबदारी उचलली. त्यांचे वरईमध्ये घर आणि शेती असल्यामुळे त्यांना परिस्थितीची माहिती होती. मुलं आपापल्या नातेवाईकांकडे थांबली. त्यांची शाळा सुरू राहिली आणि जेवणाचा प्रश्नही सुटला. या सगळ्यांत मोठी जबाबदारी पार पाडताहेत ते वरईचे गुरुजी. शाळा-मुलं-पालक-शिक्षण-जेवणाची जबाबदारी- आम्ही या सगळ्यांशी सतत संपर्कात राहून सगळ्यांना अपडेट देणे हे दिव्य आहे...तेही स्वतःच्या सांसारिक, कौटुंबिक जबाबदार्या निभावताना. मुलांचा सर्वांगीण विकास होतोय.
लाजरीबुजरी मुलं आता धीटपणे आपापली कला दुसर्या शाळेतील मुलांसमोर सादर करताहेत. कोमेजलेले, मलूल चेहरे आता आनंदी आहेत. एवढेच नाही, तर गुरुजी आणि मुलं रविवारी, सुट्टीच्या दिवशीसुद्धा शाळेत येतात. आमच्या प्रयत्नांना मिळालेली हीच मोठी पोचपावती आहे. अजून पुढे मे महिन्यांपर्यंत त्यांच्या जेवण्याचा प्रश्न सोडवायचा, तर आहेच आणि अजून अशी बरीच मुलं आहे. ज्यांना असा सकस आहार कशाप्रकारे उपलब्ध होईल, यासाठीही प्रयत्न करायचा आहे. आपण सर्वांसोबत आहातच म्हणून या मुलांच्या आयुष्यात ‘तिमिरातुनी तेजाकडे...’ नेण्याचा प्रवास सुरू आहे.
(अधिक माहितीसाठी संपर्क : लेट्स इमॅजिन टुगेदर फाऊंडेशन - 9820003834)
पूर्णिमा नार्वेकर