पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाचे नाव कायम राहणार;सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

19 Feb 2024 18:28:51
Sharad Pawar

नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटास दिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार हे नाव पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ३ आठवड्यांनी होणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयीच्या निकालास शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयात सोमवारी त्याविषयी सुनावणी झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थात अजित पवार यांच्याकडून केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटास दिलेल्या नावास आक्षेप घेतला. त्यावर शरद पवार गटाकडून निवडणुका तोंडावर असताना पक्ष आणि चिन्हाशिवाय कसे रहायचे, असा युक्तीवाद करण्यात आला.

न्यायालयाने हा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार हे नाव वापरण्यास परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे शरद पवार यांच्यातर्फे नव्या चिन्हासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज केल्यानंतर त्यांना सात दिवसांच्या आत नवे चिन्ह देण्यात यावे, असेही निर्देश आयोगास दिले आहेत. तसेच याप्रकरणी अजित पवार यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.






Powered By Sangraha 9.0