"राऊतांनी आरशात बघून टीका करावी!"

19 Feb 2024 12:46:44

Vinayak Raut


मुंबई :
विनायक राऊतांनी टीका करण्याच्या आधी आरशात बघावं असा घणाघात भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. उबाठा गटाचे नेते विनायक राऊत यांनी निलेश राणे यांच्या सभेवर टीका केली होती. यावर आता नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे. सोमवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
नितेश राणे म्हणाले की, "वयानुसार कदाचित विनायक राऊतांची स्मरणशक्ती कमी होत असेल. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात त्यांनी किती कडवट शिवसैनिकांना मंत्रिपद दिले होते याची यादी दाखवावी. उद्धव ठाकरेंची कणकवलीची सभा ही विकृतीचे उत्तम दर्शन घडवणारी होती. विनायक राऊतांचे पक्षप्रमुख कणकवलीमध्ये येऊन ज्या भाषेत भाषण करुन गेले ती खरी विकृती होती. त्यामुळे विनायक राऊतांनी आरशात बघून टीका केली असती तर बरं झालं असतं," असे ते म्हणाले.
 
मोदीजींच्या नेतृत्वावर सर्वांचा विश्वास
 
ते पुढे म्हणाले की, "मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश होत आहेत. आज भारतात मोदींचीच गॅरंटी लोक स्विकारतात यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे कुठल्या पक्षातला कुठला मोठा नेता येऊ पाहतोय ही बातमी ऐकल्यानंतर आश्चर्य वाटत नाही. कारण राहूल गांधींचे नेतृत्व अतिशय अपयशी ठरलं आहे. त्यांचं मोहब्बतचं दुकान आता नफरतचं दुकान आहे, हे आता प्रत्येकाला कळून चुकलं आहे. तसेच मोदीजींच्याच नेतृत्त्वाखाली भारत देश विकास करु शकतो हा विश्वास असल्याने मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये येण्याची रांग वाढत आहे," असेही नितेश राणे म्हणाले आहेत.



Powered By Sangraha 9.0