काँग्रेसमध्ये महाभूकंप होणार? भाजपच्या बड्या नेत्याचा दावा

17 Feb 2024 15:46:14
Congress party internal Conflict BJP Leader Statement

मुंबई :
  पक्षातील गटबाजी, नाना पटोलेंशी असलेला वाद यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम केला. चव्हाण भाजपत आल्यानंतर त्यांची राज्यसभेच्या उमेदवारीसाठी निवड झाली. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात असला तरीही आणखी एक मोठा भूकंप काँग्रेस पक्षात होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप आमदार डॉ. परिणय फूकेंनी स्वतःच याबद्दल प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. या संदर्भात एक बैठकही झाली, अशी सुत्रांची माहिती आहे.

अशोक चव्हाणांसोबत आणखी १६ ते १७ आमदार भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. यापूर्वीही त्यांच्या अशोक चव्हाणांसोबत बैठका पार पडल्या आहेत. काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींवर कुणाचा भरवसा नाही. त्यांना जनाधार नाही, राहुल गांधींचं नेतृत्त्व अनेक काँग्रेस नेत्यांनाच मान्य नाही. त्यामुळे अनेक नेते हा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट फुके यांनी TV9शी बोलताना केला आहे. अशोक चव्हाणांना नेतृत्त्व मानणारा गट आजही काँग्रेसमध्ये आहे. अशोक चव्हाणांकडे असलेले काँग्रेसमधील मराठा समाजाचे नेतृत्त्व पहाता, अनेक आमदार त्यांच्यासोबत नव्या जोमाने काम करण्यासाठी उत्सुक आहेत, त्यामुळे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

काँग्रेसचं डॅमेज कंट्रोलही फोल?

प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी यापूर्वी अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशानंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी दोन बैठका घेतला. या बैठकीत विधीमंडळाचे सर्वच नेते अपेक्षित होते. मात्र, विधानसभेतील एकूण सात आमदारांची अनुपस्थिती होती. याचे कारण विचारले असता नाना पटोलेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी अनुपस्थित असलेल्या आमदारांनी काँग्रेसच्या नेतृत्त्वावर आपण खूश नसल्याचा इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. नाना पटोले काहीकाळ दिल्लीलाही जाऊन आले मात्र, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. अशोक चव्हाणांना थांबविण्यात नाना पटोलेंना यश मिळाले नाही.

अशोक चव्हाणांच्या पाठिंब्याने नांदेड भक्कम करणार!

राज्यसभा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अशोक चव्हाणांनी भाजपच्या पक्षसंघटनेसाठी काम करणार असल्याचा इशारा दिला आहे. भाजपला नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अन्य जिल्यांमध्ये मजबूत करण्याच्या प्रयत्नात अशोक चव्हाण आहेत. यानिमित्त विद्यमान आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे भाजपतर्फे काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे.

Powered By Sangraha 9.0