'भाजप सोडा नाहीतर तुम्हाला बॉम्बने उडवून देऊ';नितीश कुमार यांना धमकी!

    15-Feb-2024
Total Views |
Nitish Kumar news

नवी दिल्ली
: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दिल्ली उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. दि.१४ फेब्रुवारी २०२४ संध्याकाळी उशिरा न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलला एक ईमेल प्राप्त झाला, ज्यामध्ये गुरुवारी न्यायालयात मोठा स्फोट घडवणार असल्याची माहिती होती. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार जर भाजप पक्षापासून वेगळे झाले नाही तर त्यांना ही बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. डीजीपींना ऑडिओ क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आली आहे.

एका अज्ञात व्यक्तीने बिहारचे पोलीस महासंचालक (डीजीपी) आरएस भाटी यांना एक ऑडिओ क्लिप पाठवली. आरोपीने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, "नितीश यांना सांगा की भाजपसोबत जाऊ नका, अन्यथा आम्ही त्यांच्यावर बॉम्बस्फोट करू आणि त्यांच्या आमदारांनाही मारून टाकू." हा ऑडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी सोनू पासवान नावाच्या गुन्हेगाराला अटक केली आहे.

ऑडिओ क्लिपनंतर आरोपीवर प्रथम आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला. त्यानंतर बिहार पोलिसांना आरोपीची ओळख पटवण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांना कळले की, धमकी देणारा आरोपी सोनू पासवान हा बिहारमधील दयानगर, समस्तीपूरचा रहिवासी असून तो बेंगळुरूमध्ये शिलाईचे काम करतो.सोनूला कर्नाटकातील देवनागिरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. यूट्यूब आणि टीव्ही चॅनेलवर सत्तापालटाच्या बातम्यांमुळे त्याने धमकीचा मेसेज पाठवल्याचे सोनूने सांगितले. वारंवार झालेल्या सत्तापालटांमुळे बिहारमधील विकासावर परिणाम होत होता आणि गरिबी आणि बेरोजगारी वाढत होती. पोलिसांनी त्याचा मोबाईलही जप्त केला आहे.

दुसरीकडे दिल्ली उच्च न्यायालयात स्फोटाची धमकी मिळाल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. यासंदर्भात पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, “मी १५ फेब्रुवारीला तुम्हाला बॉम्बने उडवून देईन. हा स्फोट दिल्लीतील सर्वात मोठा स्फोट असेल. शक्य तितकी सुरक्षा तैनात करा… सर्व मंत्र्यांना बोलवा. आम्ही सगळे मिळून तुम्हाला उडवून देऊ.”स्फोटाची धमकी मिळाल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाच्या संकुलात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. संपूर्ण परिसराची झडती घेतली जात आहे. मात्र, तपासणीअंती आवारात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. दरम्यान, धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.