राज्यसभा निवडणूक : अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि देवरांनी भरला अर्ज

15 Feb 2024 16:07:37

BJP Rajyasabha


मुंबई :
येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभा निवडणुका पार पडणार आहेत. दरम्यान, गुरुवारी सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी आपला अर्ज भरला आहे. यावेळी भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे, शिवसेनेकडून मिलिंद देवरा तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांनी अर्ज भरला.
 
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अशोक चव्हाणांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "राज्यसभेच्या संदर्भात विधानसभेच्या सभागृहात निर्वाचन अधिकाऱ्यासमोर माझा उमेदवारी दाखल केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मी आभार मानतो. नामांकनाची कायदेशीर प्रक्रिया मी आज पुर्ण केली आहे. यानिमित्ताने माझ्या आयुष्यातील एक नवीन राजकीय सुरुवात मी केली आहे. ही निवडणुक चांगल्या पद्धतीने पार पडेल अशी मला आशा आहे," असे ते म्हणाले.
 
शिवसेनेचे नेते मिलिंद देवरा म्हणाले की, "शिवसेनेच्या माध्यमातून मुंबई, महाराष्ट्र आणि भारताची प्रामाणिकपणे सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी मनापासून आभार मानतो. मी प्रत्येक कार्यकर्त्याला आश्वासन देतो की, मी दिल्लीच्या संसदेत प्रामाणिकपणे मुंबई आणि महाराष्ट्र शिवसेनेचे उत्तम प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करेन."
 
तसेच यावेळी बोलताना भाजप नेत्या मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, "आज मी राज्यसभेचा अर्ज दाखल केला असून ही अतिशय आनंदाची भावना आहे. पक्षाने चांगलं काम करण्याची संधी दिली त्याबद्दल वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आणि या संधीचं नक्कीच सोनं करेन," अशी ग्वाही त्यांनी दिली.




Powered By Sangraha 9.0