आमदार अपात्रता निकाल! काकांच्या हातातलं घड्याळ निसटलं!

15 Feb 2024 17:26:51

Sharad Pawar


मुंबई :
अजित पवार गट हाच मुळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी गुरुवारी दिला आहे. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेबाबत निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय दिला आहे.
 
निकालाचे वाचन करताना राहूल नार्वेकर म्हणाले की, "या पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही. मात्र दोन गट तयार झालेले आहेत. प्राथमिक स्तरावर मी पक्षीय रचना, घटना व विधीमंडळ बळ या त्रिसूत्री वर मत नोंदवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारणी हीच सार्वभौम आहे."
 
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना सर्वात महत्त्वाची आहे. दोन्ही गट त्याला बांधिल आहेत. ३० जून २०२३ ला या पक्षात फूट पडली. अशावेळी नेतृत्त्वाबाबत पक्षाची घटना काय सांगते हे महत्त्वाचं आहे. शिवसेनेसंदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल. राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत"
 
"आपला अध्यक्ष कसा योग्य हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूंनी पुरावे दिले. दोन्ही गटांकडून समांतर दावे करण्यात आले. प्रतिनिधिंच्या निवडणुकीचे पुरावे शरद पवार गटाकडून सादर करण्यात आले नाहीत. अजित पवार यांना विधिमंडळात बहुमत आहे. अजित पवार गटाकडे ५३ पैकी ४१ आमदार आहे. त्यामुळे बहुमताआधारे अजित पवार गट हाच मुळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे," असा निर्णय राहूल नार्वेकरांनी दिला आहे.



Powered By Sangraha 9.0