रसिका शिंदे-पॉल
मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर हे उत्तम नट तर आहेच पण त्यांच्या लिखाणातूनही अनेक अजरामर कलाकृती रंगभूमीवर, मालिकांमध्ये घडल्या आहेत. ‘आता वेळ झाली’ या त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दल ‘महाएमटीबीशी’ संवाद साधताना दिलीप प्रभावळकर यांनी त्यांच्या गाजलेल्या अनेक नाटकांपैकी एक असलेल्या ‘हसवाफसवी’ या नाटकाचा एक किस्सा सांगितला. या नाटकात प्रभावळकर यांनी ६ विविधांगी पात्रं साकारली होती. या नाटकाची खास आठवण सांगताना ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी त्यांचे हे ‘हसवाफसवी’ नाटक पाहून केलेले कौतुक आणि त्यांना लिहिलेल्या पत्राबद्दलही त्यांनी सांगितले.
“ ‘हसवाफसवी’ नाटक म्हणजे नाटक कसे लिहू नये याचा एक आदर्श वस्तुपाठ होता. पण माझ्यातल्या लेखकाने माझ्यातल्याच नटासाठी लिहिलेली की एक कलाकृती होती. मी एकाचवेळी दोन-तीन भूमिका करु शकतो याची मला जाणीव झाली होती. त्यामुळे स्वत:लाच आव्हान देण्यासाठी मी एकमेकांशी संबंध नसलेली ६ पात्रं लिहिली. आणि अनपेक्षितपणे त्या नाटकाला यश मिळाले, त्याचे ७५० प्रयोग झाले. त्या नाटकाच्या एका प्रयोगाला डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, पु. ल. देशपांडे आले. सत्यजित दुबे तर त्यांच्या विद्यार्थ्यांना घेऊन आले. पण मला डॉ. लागू आल्यामुळे जरा भीती वाटत होती. मी विचार करत होतो की लागूंसारख्या कलाकारांना हे विनोदी नाटक कसं वाटेल. पण ते हसवाफसवी या माझ्या नाटकाच्या प्रेमात पडले. आणि त्यांनी मला एक पत्र लिहिलं, त्यात त्यांनी लिहिलं होतं की, हसवाफसवीचा प्रयोग पाहणं म्हणजे अभिनयाचा वर्षभराचा अभ्यासक्रम पुर्ण करण्यासारखे आहे. त्यांच्या परवानगीने मी ते पत्र छापलं पण होतं”, असा अविस्मरणीय अनुभव त्यांनी सांगितला.