लखनौ : काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी 'एक्स' सोशल मीडिया हँडलवर लिहिले, "माननीय काँग्रेस अध्यक्ष श्री खरगे जी! आदरणीय सर, मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे."
काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर विभाकर शास्त्री यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी आणि उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाच्या प्रदेश मुख्यालयात भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. काँग्रेसकडून विभाकर शास्त्री यांनी तीन वेळा लोकसभेची निवडणूक लढली. पण त्यांना एकदाही विजय मिळवता आला नाही.
काँग्रेसने माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्री यांच्या वारसा नष्ट केल्याचा आरोप भाजप करत असते. गांधी कुटुंबाव्यतिरिक्त काँग्रेसने कोणत्याही मोठ्या नेत्याच्या कामाची दखल घेतली नाही, असा आरोप भाजप करत असते. त्यातच आता विभाकर शास्त्री यांनी सुद्धा काँग्रेस पक्षातून राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.