“...आणि त्यादिवशी 'शिवरायांचा छावा' चित्रपटाचा सेट वाहून गेला” , दिग्पाल यांनी सांगिताला ‘तो’ किस्सा

    13-Feb-2024
Total Views |

digpal lanjekar 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भव्य दिव्य ऐतिहासिक चित्रपट तयार करण्याचे शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी खांद्यावर घेतले आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास शिवराज अष्टकातून ते प्रेक्षकांसमोर मांडत आहेतच. परंतु, आजवर छत्रपती संभाजी महाराजांनी जो पराक्रम आणि इतिहास घडवून ठेवला त्याला योग्य न्याय कोणत्याच माध्यमातून दिले गेले नाही आणि आजच्या तरुणांना छत्रपती संभाजी महाराजांनी कमी वयात किती पराक्रम केले होते हे समजावे आणि त्यातून आजच्या तरुणांनी नैराश्यकडे न झुकता धैर्याने कामं केली पाहिजे हा छुपा संदेश देण्याच्या उद्देशाने ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट करण्याचे ठरवले अशी माहिती दिग्पाल लांजेकर यांनी ‘महाएमटीबी’शी बोलताना दिली. याशिवाय त्यांनी चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी झालेला महत्वाचा किस्सा देखील सांगितला.
 
दिग्पाल म्हणाले की, “मुंबईजवळील नायगावच्या भागात आम्ही शिवरायांचा छावा या चित्रपटाचा सेट उभारला होता. ज्यावेळी आम्ही या चित्रपटाचे चित्रिकरण करत होतो तेव्हा पाऊस येण्याच्या मार्गात होता. मुळात गड, किल्ल्यांची प्रतिकृती असल्यामुळे सेट वरुन मोकळा होता. त्यामुळे आम्हाला पाऊस येण्याआधी चित्रिकरण संपवायचे होते. जी भीती होती ते झालंच. पण खरंच शिवरायांची कृपा अशी की आमच्या संपुर्ण सेटवर पावसाचा एक थेंबही पडला नाही. आम्ही सेटवर उभं राहून दुरवर कोसळणारा पाऊस आणि ढगांचा गडगडाट अनुभवत होतो, पण आमच्या शुटमध्ये पावसाची बाधा आली नाही. ज्यादिवशी आम्ही शेवटटे चित्रिकरण त्या सेटवर केले आणि निघालो, त्यानंतर मला फोन आला आणि सांगितलं की सर आता इतका पाऊस पडत आहे की संपुर्ण सेट वाहून गेला. ते ऐकून मी इतका भारावून गेलो की, खरंच ज्यावेळी मनापासून तुम्ही जेव्हा एखादी कलाकृती घडवत असता त्यासाठी तुम्हाला नकळतपणे त्याच मोठ्या माणसांचे आर्शिवाद लाभतात आणि यावेळी आम्हाला केवळ छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर छत्रपती संभाजी महाराजांचे देखील आर्शिवाद लाभले आणि हा चित्रपट पुर्ण झाला”, अशी चित्रिकरणाची मनाला भिडणारी गोष्ट दिग्पाल लांजेकर यांनी सांगितली.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.