मुंबईतील बेघर मुलांच्या शिक्षणासाठी सुरू होणार पहिली ‘सिग्नल शाळा’

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मांडली होती संकल्पना

    13-Feb-2024
Total Views |
Signal School news

मुंबई : मुंबईत उदरनिर्वाहासाठी आणि आसऱयासाठी वाहतूक दिवे (सिग्नल) किंवा उड्डाणपुलाखाली राहणाऱया मुलांनाही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळावी, म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचे व अभिनव पाऊल टाकले आहे. तब्बल १०० मुलांच्या शैक्षणिक व्यवस्थेची ‘सिग्नल शाळा’ महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याचा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा मानस आहे. मुंबई पूर्व उपनगरामध्ये सांताक्रुझ चेंबूर जोडरस्त्याच्या उड्डाणपुलाखाली अमर महल (चेंबूर) येथे ही ‘सिग्नल शाळा’ साकारण्यात येणार आहे.

मुंबईत पूर्व उपनगरामध्ये बेघर मुलांसाठीच्या झालेल्या सर्वेक्षणानुसार चेंबूर येथील अमर महाल येथे महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने सिग्नल शाळेसाठी जागा शोधली. या शाळा उभारणीसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. शाळेमध्ये अत्यावश्यक साधनसामुग्री, विज्ञान प्रयोगशाळेतील उपकरणे आणि साधनसामुग्री, संगणक, प्रिंटर्स तसेच शाळेशी निगडित इतर बाबींचा पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली आहे.स्थलांतरित किंवा बेघर कुटुंबीय आणि लहान मुले ही प्रसंगी उदरनिर्वाहासाठी वाहतूक दिवे (सिग्नल), उड्डाणपुलाखाली तसेच चौकाच्या ठिकाणी उघड्यावर वास्तव्य करत असल्याचे आढळते. त्याअनुषंगाने समर्थ भारत व्यासपीठ स्वयंसेवी संस्थेने २०१८ मध्ये ठाणे येथील तीन हात नाका येथे सिग्नल शाळा सुरू केली होती.

सिग्नल जवळच्या बेघर विद्यार्थ्यांना एकत्र आणून या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी ही संस्था चांगले काम करत आहे. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी माध्यमिक शिक्षण घेतानाच व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षणही घेतले आहे. याच धर्तीवर मुंबईत पूर्व उपनगरात एक सिग्नल शाळा उभारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने पुढाकार घेतला आहे. साधारणपणे ६० ते १०० विद्यार्थ्यांच्या क्षमतेची ही शाळा उभारण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने निविदा प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. अधिकाधिक अद्ययावत सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या शाळांच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी माहिती संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसोबतच कुटुंबाच्या सामाजिक प्रगतीचा प्रयत्नही या पुढाकाराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मांडली होती संकल्पना

राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यतामंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईतील बेघर मुलांसाठी शैक्षणिक व्यवस्था निर्माण करण्याची गरज व्यक्त केली होती. त्या अनुषंगानेच नाविण्यपूर्ण अशा ‘सिग्नल शाळे’ची उभारणी करण्याचाही पर्याय मंत्री लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेला सुचवला होता. बेघर मुलांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षणाची सुविधा, बौद्धिक विकास आणि उज्वल भविष्यासाठीची संधी देणारी ‘सिग्नल शाळा’ उभारण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबालसिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. जिल्हा नियोजन समिती (मुंबई उपनगर)च्या निधीतून सदर प्रकल्पासाठीची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.