राज्यसभेसाठी शरद पवारांकडून शाहू महाराजांच्या नावाचा प्रस्ताव

    13-Feb-2024
Total Views |
Sharad Pawar


मुंबई
: काँग्रेसमधील अस्वस्थता हेरून भाजपाने राज्यसभा निवडणुकीत चौथा उमेदवार देण्याची रणनीती आखली आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रॉस व्होटींग रोखण्यासाठी शरद पवार यांनी राज्यसभेसाठी शाहू महाराजांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेसला दिला आहे.मुंबई दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मंगळवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवाराला सहकार्य करण्याची विनंती केली. काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोर यांचे नाव अंतिम केले जात असल्याचे चेन्नीथला यांनी त्यांच्या कानावर घातले.

मात्र, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर संभाव्य फूट टाळायची असल्यास सर्वसमावेशक नेतृत्त्वाला संधी द्यावी लागेल, अन्यथा भाजपाचा चौथा उमेदवार सहज विजयी होईल, अशा शब्दांत शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांचे कान टोचले.मविआच्या वतीने कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिल्यास भाजपा माघार घेईल किंबहुना आमदारही त्यांच्याविरोधात मतदान करणार नाहीत. त्यामुळे शाहू महाराजांनाच महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता मिळावी, असा प्रस्ताव पवारांनी रमेश चेन्नीथला यांच्या समोर ठेवला. त्यावर, हायकमांडशी चर्चा करून कळवतो, अशी भूमिका चेन्नीथला यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.