राज्यपालांच्या उपस्थितीत पार पडणार SNDT महिला विद्यापीठाचा ७३ वा दीक्षांत समारंभ!

    13-Feb-2024
Total Views |

SNDT


मुंबई : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा (एसएनडीटी) ७३ वा वार्षिक दीक्षांत समारंभ दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. एसएनडीटीच्या चर्चगेट येथील कॅम्पसमधील पाटकर हॉलमध्ये सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.
 
राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ७३ वा दीक्षांत समारंभ पार पडेल. या समारंभामध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये विविध अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्येल्या विद्यार्थिनींना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात येतील.
 
सदर दीक्षांत समारंभामध्ये एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या स्वायत्त महाविद्यालयासहित जवळपास १३७४९ विद्यार्थिनींना १९३ विषयातील पदवी आणि पदविका प्रदान करण्यात येतील. एकूण ४३ विद्यार्थिनीना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी देण्यात येतील. तसेच परीक्षेमध्ये अव्वल स्थान प्राप्त केलेल्या ७१ विद्यार्थिनींना सुवर्ण पदक, १ विद्यार्थिनींना रजत पदक, १ ट्रॉफी आणि १३३ विद्यार्थिनींना रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू प्रा. रुबी ओझा आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत. दीक्षांत समारंभाची सविस्तर माहिती आणि सदर समारंभाच्या थेट वेबकास्टची लिंक विद्यापीठाच्या www.sndt.ac.in या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध होईल, अशी माहिती एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. संजय नेरकर यांनी दिली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.