सौंदर्यजतन, सौंदर्यवर्धन-आयुर्वेदासंगे...

    12-Feb-2024
Total Views |
article on alopecia in Hair fall treatment

मागील काही लेखांमधून आपण केस गळण्याची विविध कारणे आणि त्यावरील उपाय याविषयी माहिती करुन घेत आहोत. आजच्या लेखातून याविषयी आणखीन काही पुढील प्रकारांबद्दल जाणून घेऊया.

'अ‍ॅलोपेसिया’ (alopecia) हे केस गळण्याच्या समस्येचे शास्त्रोक्त नाव आहे, हे मागील लेखात आपण वाचले. तसेच ‘टेलोजेनिक अ‍ॅलोपेसिया’ व ‘टॅ्रक्शन अ‍ॅलोपेसिया’ याबद्दलही आपण विस्तृत जाणून घेतले. आजच्या लेखात प्रेशर अ‍ॅलोपेसिया, अ‍ॅण्ड्रो-जेनिटिक अ‍ॅलोपेसिया आणि अ‍ॅलोपेसिया अराटा याबद्दल जाणून घेऊया.

प्रेशर अ‍ॅलोपेसिया म्हणजे, काही डोक्याचा भाग जो जास्त रगडला जातो, घासला जातो किंवा सतत उशी/गादीच्या संपर्कात असतो, त्या भागाचे केस जाणे. हे बहुदा लहान मुलांमध्ये आढळते. पाठीवर झोपवले (झोळीत/पाळण्यात/गादीवर) तर बरेच तास कूसही न बदलता ते बाळ त्याच स्थितीत झोपते. त्यामुळे पाठीमागच्या बाजूस अधिक ताण, घर्षण व उष्णता निर्माण होते आणि केस गळू लागतात. दाब कमी होण्यामुळे गेलेले केस पूर्ववत येऊ शकतात. ते कायमस्वरुपी गेलेल्या केसांप्रमाणे नसतात. त्याचप्रमाणे ज्या कुशीवर बाळ झोपते, त्या कुशीच्या बाजूचे (उजव्या किंवा डाव्या) बाजूचे केस ही याच पद्धतीने गळून जातात. तेवढ्या भागी तात्पुरते टक्कल पडते किंवा केस अति विरळ होतात.

‘अ‍ॅण्ड्रो-जेनिटिक अ‍ॅलोपेसिया’ या प्रकारच्या केसांच्या समस्या घेऊन अनेक रुग्ण दवाखान्यात येतात. या प्रकारच्या केसगळतीचे एक विशिष्ट पॅटर्न असते. स्त्रियांमधील पॅटर्न हे पुरुषांमधील पॅटर्नपेक्षा भिन्न असते. या प्रकारच्या केस गळण्याचे मुख्य कारण म्हणजे हॉर्मोन्समधील असमतोल. बरेचदा रुग्ण दवाखान्यात आल्यावर केस अति गळताहेत व खूप खरखरीत व रुक्ष झाले आहेत, असे सांगतात. काही तपासण्या करून घेतल्यावर कळते ही, त्यांच्या शरीरात थायरॉईडची मात्रा कमी/जास्त झाली आहे. तसेच, जेव्हा मुलींमध्ये पॅटर्नचा त्रास/ लक्षणे उत्पन्न होतात, तेव्हा त्यातील एक लक्षण म्हणजे डोक्यावरील केस विरळ होणे व चेहर्‍यावरील केसांची वाढ अधिक होणे आणि ती वाढ जाड राठ केसांची होणे. काही वेळेस तपासण्या केल्यास सुरुवातीस त्यात काही बिघाड दिसत नाही. पण, वरील लक्षणे मात्र उत्पन्न झालेली असतात. कालांतराने रक्त तपासण्या सोनोग्राफी व अन्य परीक्षणांमध्येही हार्माोन्समध्ये बिघाड व त्यामुळे होणारे शारीरिक बदल दिसतात.

तसेच रजोनिवृत्तीच्या वयात हार्मोनल बदलांमुळे याप्रकारचे केस गळणे अचानक सुरू होऊ शकते. काही विशिष्ट खेळांमध्ये ज्यात ‘मसल बिल्डिंग’ करावे लागते, अशा महिला खेळाडूंमध्ये हार्मोनल असंतुलन होण्याची शक्यता अधिक असते व त्याचा अनिष्ट परिणाम केसांवर आवश्यक दिसतो. स्त्रियांमधील ‘अ‍ॅण्ड्रो-जेनिटिक अ‍ॅलोपेसिया’च्या पॅटर्नचे परीक्षण 'l'gradation-ludwig scale' ने केले जाते, तर पुरुषांमधील ‘अ‍ॅण्ड्रो-जेनिटिक अ‍ॅलोपेसिया’चे Gradation - 'The Norwood-Hamilton classification'ने केले जाते. ग्रेडची जेवढी तीव्रता अधिक असते, तेवढेच ते चिकित्सेला अधिक काळ घेणारे असतात. या प्रकारच्या हार्मोनल असंतुलनामुळे होणार्‍या चिकित्सेमध्ये केवळ बाह्योपचार उपयोगाचे नाही. बरेचदा रुग्ण विचारतात की, कोणते तेल/सीरम/शॅम्पु वापरल्याने केस गळणे थांबून केस वाढू लागतील? तर यावर आयुर्वेदानुसार सांगायचे झाले, तर केवळ बाह्योपन केल्यास तात्पुरता फरक जाणवेल/दिसेल. पण, शरीराची गरजेनुसार पंचकर्माने शुद्धी करून हार्मोन्समधील असंतुलन पुन्हा उत्पन्न करणे गरजेचे आहे. ‘अ‍ॅण्ड्रो-जेनिटिक अ‍ॅलोपेसिया’ या शारीरिक दोषांचा समतोल बिघडलेला असतो, तो प्रस्थापित करणेही महत्त्वाची चिकित्सा आहे. यासाठी औषधोपचार, व्यायाम, नियमित शांत झोप आणि पोषक आहार घेणे गरजेचे आहे.

याचबरोबर तणावमुक्त राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, ताणाचा आणि आपल्या मानसिकतेचा परिणाम अंतःस्रावी ग्रंथीवर (hormons) वर होताना दिसतो. अंतःस्रावी ग्रंथींचे कार्य अबाधित राहण्यासाठी शारीरिक स्वास्थाबरोबरच मानसिक शांतता व स्थिरता असणे गरजेचे असते म्हणूनच hormonal changes/Imbalance असतेवेळी स्त्रियांच्या वागवण्यात एखाद्या गोष्टीवर पटकन ‘रिअ‍ॅक्ट’ होण्यात आणि स्वभावात बदल होताना दिसतो. यासाठी तज्ज्ञ वैद्यांकडून चिकित्सा द्यावी. जाहिरात बघून आणि 'self-medication' करू नये.

अजून एक प्रकारचा केस गळणे म्हणजे, ‘अ‍ॅलोपेसिया अराटा’ याला बोलीभाषेत ‘चाई पडणे’ असे म्हटले जाते. चाई सहसा डोक्यावरील केंसामध्ये जास्त आढळते. चाई जिथे होते, तेवढा भाग केसविरहित तुळतुळीत होतो. क्वचितप्रसंगी खाज किंवा वेदना होतात. बरेचदा एका SPOT /PATCH पासून सुरू होऊन त्याचा घेर वाढणे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अजून नवीन उत्पन्न होणे, असे घडू शकते. काही वेळेस दाढीच्या केसांमध्ये देखील चाई होताना आढळते. आयुर्वेदाच्या उपचाराने चाई समूळ नष्ट होते. बरेचदा चाईची पुनरावृत्ती होताना दिसते. पण, पंचकर्म आभ्यंतर, चिकित्सा आणि स्थानिक बाह्योपचाराने पुनरावृत्तीही संपूर्णपणे नष्ट करता येते, थांबवता येते.

केस गळणे यावर त्याच्या कारणांनुसार विविध उपचार आयुर्वेदात सांगितले आहेत. पण, सर्वच केळ गळणे ‘अ‍ॅलोपेसिया’ चिकित्सेने बरे होतात, असे नाही. ज्या केसांच्या समस्येमध्ये केसांचे मूळ शाबूत आहे, त्या व्याधींमध्ये पुन्हा केसांची निर्मिती करता येते. पण, काही वेळेस या स्थितीच्या पुढे कंडिशन गेलेली असते. म्हणजे केसांचे मूळ नष्ट झालेले असते. हा 'Irreversible' बदल आहे. काही वेळेस केसाच्या मुळांवर आवरण येते व त्यामुळे केसांची वाढ खुंटते. अशा परिस्थितीमध्येही केस पुन्हा (चिकित्सा केल्यानंतर) पण जेव्हा समूळ केसाचा नाश झाला असतो, तेव्हा नवीन केसांची उत्पत्ती होणे कठीण आहे. (IRREVERSIBLE HAIR LOSS)सारखी चिकित्सा सुरू असते वेळी ही बरेचदा रुग्णांचे केस संपूर्ण गळून जातात. अशा स्थितीत केसांची मुळे उद्ध्वस्त झालेली नसतात. पण, औषधांच्या कार्यामुळे नवीन पेशींची उत्पत्ती थांबवली जाते. वर चिकित्सेचा कालावधी संपला की, नवीन पेशी पुनरुज्जीवित होऊन केस उगवू लागतात. त्या रुग्णांचे वय, प्रकृती व किमोथेरपीच्या औषधांच्या तीव्रतेवर केसांचे गळणे किती होईल, ते अवलंबून असते. अशा वेळेस केसांना पूरक व किमोथेरपीला पूरक अशी औषधी योजना यशस्वीरित्या करता येते. पण, स्वत:च स्वत:ची औषधी चिकित्सा करणे अवश्य टाळावे.
 
एका मानसिक विकृतीमध्ये ही गळण्याचे/पडण्याचे परिणाम दिसतात. त्या विकृतीला ’TRICHOPHAGIA’ असे म्हणतात. म्हणजे, आपलेच केस आपणच हाताने खेचून तोडणे. ही एक ’Obsessive-compulsive disorder (OCD)’ आहे आणि याची चिकित्सादेखील शारीरिक व्याधीची चिकित्सा असे स्वरुप नसून मानसिक चिकित्सा counselling इ. पद्धतीने करावे लागते. हा स्त्रियांमध्ये अधिक होताना आढळतो. डोक्यावरील केस, पापणी/भूवयांचे केस हेदेखील हाताने ओढून तोडले/खेचले जातात. बरेचदा आपण असे करतोय, हे देखील रुग्णांना त्या क्षणी कळत नसते. यातील अजून मनोविकृती म्हणजे ’TRICHOPHAGIA’ म्हणजे केस तोडून खाणे. यातही मानसिक स्वास्थ्यावरच लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. (क्रमश:)

वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
९८२०२८६४२९
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.