"भारत आणि इस्रायल दोघांसाठीही दहशतवाद मोठी समस्या"

इस्रायलच्या परिवहन, रस्ते सुरक्षा मंत्री मिरी रेगेव्ह यांचे वक्तव्य

    12-Feb-2024
Total Views |
Israel Minister Miri Regev on mumbai tour

मुंबई :  
इस्रायलच्या परिवहन, रस्ते सुरक्षा आणि राष्ट्रीय पायाभूत सुविधा मंत्री मिरी रेगेव्ह दि. १२ फेब्रुवारी २०२४ सोमवारी मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. आपल्या दौऱ्याची सुरुवात त्यांनी कुलाबा परिसरातील नरिमन हाऊला भेट देऊन केली. याचं नरिमन हाऊसवर दि. २६ नोव्हेंबर २००८ मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला करुन निष्पाप नागरिकांचा जीव घेतला होता. या हल्ल्यातील शहीदांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला.

पत्रकारांशी संवाद साधताना मिरी रेगेव्ह म्हणाल्या की, "भारत आणि इस्रायल दोघांसाठीही दहशतवाद ही एक मोठी समस्या आहे. दहशतवादांने दोन्ही देशांच्या निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे." पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "भारत आणि इस्रायल एकमेकांचे प्रतिस्पर्धी नाहीयेत. तर एकमेकांसाठी पुरक आहेत. दोघांच्या संधी आणि समस्या सारख्याच आहेत."

इस्रायल-हमास युद्धाच्या सध्यस्थितीवर आणि इस्रायलच्या पुढील योजनेवर प्रश्न विचारण्यात आला असता त्या म्हणाल्या की, "गाझामधून हमासचा संपूर्ण नायनाट होत नाही, तोपर्यंत युद्ध चालूच राहणार. युद्ध सुरु झाल्यापासूनच आमची ही भूमिका आहे. त्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही."

नरिमन हाऊसमधील कार्यक्रमानंतर मिरी रेगेव्ह यांनी मुंबईतील किनारी रस्ता प्रकल्पांची पाहणी केली. मुंबईतील सागरी प्रकल्प पाहून भारावलेल्या गिरी रेगेव्ह यांनी प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, " मुंबई हे सतत बदल स्वीकारणारे महानगर आहे. या शहरामध्ये प्रचंड सामर्थ्य दडलेले आहे. शिक्षण, व्यापार, आरोग्य, चित्रपटसृष्टी, पर्यटन यामध्ये अग्रेसर असलेले महानगर आता मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामुळे अधिक विकसित होणार यात शंका नाही. येथील प्रगत अभियांत्रिकी आणि कुशल कामगारांमुळेच मुंबई किनारी रस्त्यासारखा महाकाय प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत."

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.