स्त्रीरोग आणि होमियोपॅथीचे योगदान

    12-Feb-2024
Total Views |
Homeopathic Remedies For Common Gynaecological Problems

रुग्णाच्या सर्वसाधारण चिन्हे आणि लक्षणांवरून स्त्रीला झालेल्या आजाराचे भौतिक निदान करता येते. परंतु, अशी सारखी लक्षणे तसे निदान झालेल्या अनेकांना असतात. या सारख्या लक्षणांना अनुसरुन निदान झालेल्या आजाराच्या नुसत्या नावावर मग इतर औषधशास्त्रात उपचार केले जातात. थोडक्यात काय तर शरीरातील पेशीमध्ये झालेले बदल फक्त तपासून त्यावर औषध दिले जाते.

होमियोपॅथी इथेच इतरांपेक्षा वेगळी व संपूर्ण पॅथी ठरते. होमियोपॅथीत नुसते पेशींमध्ये झालेले बदल पाहिले जात नाहीत, तर ते बदल का झाले व त्यामागील प्रत्येक महिलेची कारणे अभ्यासली जातात. उदा. सारखीच लक्षणे असलेल्या दोन स्त्रियांमध्ये त्यांची वैयक्तिक लक्षणे व चिन्हे वेगवेगळी असतात. तसेच, प्रत्येक बाईची रोगप्रतिकारक शक्ती ही वेगवेगळी असते. त्याचबरोबर ज्या भौगोलिक परिस्थितीत स्त्रिया राहतात, त्या भौगोलिक परिस्थितीचाही त्यांच्यावर परिणाम होत असतो, त्याचाही विचार करावा लागतो.
 
याशिवाय ज्या वातावरणात ज्यात भौगोलिकतेबरोबरच सामाजिक व कौटुंबिक वातावरणही येते, त्याचाही अभ्यास करावा लगतो. प्रत्येक स्त्रीचे सामाजिक व कौटुंबिक वातावरण हे वेगवेगळे असते. या वातावरणाचा त्यांच्या मानसिकतेवर सतत परिणाम होत असतो. या मानसिकतेतूनच मग समज बनतात व त्यातूनच मग स्वभावामध्ये बदल होत जातात. या सततच्या बदलांचा शरीरातील स्त्रावांवर व संप्रेरकांवर परिणाम होत असतो व या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून मग शरीर काही लक्षणे व चिन्हे दाखवायला सुरुवात करते. आता हे बदल सकारात्मक किंवा नकारात्मक असे असतात. एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात जर सकारात्मक बदल होत गेले, म्हणजेच काय तर त्या स्त्रीच्या मनाप्रमाणे व इच्छेप्रमाणे जर सामाजिक व कौटुंबिक वातावरणात बदल होत गेले, तर मग त्या स्त्रीच्या वागण्यात व राहण्यात नैसर्गिक सहजता टिकून राहते, ज्यालाच आपण ’ease’ असे म्हणतो, या अशा सकारात्मक व सहजतेमुळे स्त्रीला कोणताही ताण येत नाही व पर्यायाने कुठल्याही प्रकारचे नकारात्मक शारीरिक व मानसिक बदल यात होत नाहीत.
 
परंतु, जेव्हा स्त्रीच्या आयुष्यात नकारात्मक बदल तिच्या सामाजिक, कौटुंबिक व भौगोलिक वातावरणात होतात, तेव्हा मात्र तिची धडपड सुरू होते, ती आधी असलेली सहजता (ease) टिकवून ठेवण्यासाठी. या संघर्षात प्रथम शरीर व मन व त्याला नियंत्रित करणारी जी ऊर्जा म्हणजेच चैतन्यशक्ती असते, यांची बरीच दमछाक होते. शरीराची व मनाची नैसर्गिक सहजता टिकवून ठेवण्याच्या या प्राथमिक प्रयत्नात चैतन्यशक्तीची बरीच शक्ती व ऊर्जाही खर्च केली जाते, याचा परिणाम म्हणून व चैतन्यशक्ती कमकुवत होते. यातूनही जर बाहेरुन झालेले हे आघात शमले गेले, तर मग हळूहळू चैतन्यशक्ती पूर्ववत होते.

पण, जर बाहेरील वातावरणाचे हे सततचे आघात होतच राहिले, तर मात्र स्त्रीच्या शरीराची व मनाची सहजता लोप पावते व तिचे शरीर व मन मग लक्षणांच्या व चिन्हांच्या (symptoms & signs) माध्यमातून ते दर्शवते यालाच आपण म्हणतो की, रोग झाला. सहजता जिथे लोप पावते, त्यालाच आपण ‘रोग’ असे म्हणतो. अशा या आजाराला मग नुसते शरीराचा आजार आपण म्हणू का? तर नाही, आता आपल्याला होमियोपॅथीक औषधशास्त्राची श्रेष्ठता पटली असेल की किती बारकाईने हा अभ्यास केला जातो. (क्रमश:)

डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
९८६९०६२२७६
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.