फोडाफोडीच्या धोरणाचे काँग्रेसवर बूमरँग!

    12-Feb-2024
Total Views |
Editorial on INC president Mallikarjun Kharge on INDIA Alliance

इंग्रजांनीच स्थापन केलेल्या, काँग्रेसच्या धमन्यांमध्ये ‘फोडा आणि झोडा’ हे इंग्रजांचे धोरण भिनले असले, तरी आता हे डावपेच पक्षाच्या उपयोगी पडणार नाहीत. कधी ‘भारत विरुद्ध इंडिया’, तर कधी ‘उत्तर विरुद्ध दक्षिण भारत’ वगैरे मुद्दे पुढे करून, मतदारांमध्ये फूट टाकण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सपशेल विफल होत चालले आहेत. उलट विरोधकांच्या आघाडीतील एक-एक पक्ष ही आघाडी सोडून, भाजपच्या आघाडीत सहभागी होताना दिसत असल्याने, हे फोडाफोडीचे धोरण काँग्रेसवरच उलटल्याचे दिसते.

येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’ (एनडीए) ४०० जागांचा टप्पा पार करून, पुन्हा सत्तेवर येईल, याबद्दल सामान्य मतदाराच्या मनात शंका राहिली नसून, विरोधी पक्षांनीही याची खूणगाठ बांधली आहे. भाजपविरोधात एकास एक उमेदवार देण्याचे विरोधकांचे प्रयत्न हे अपेक्षेप्रमाणेच वार्‍यावर विरून जाताना दिसत आहेत. त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘इंडी’ आघाडीतच फाटाफूट झाली असून, काही घटक पक्षांनी आपला स्वतंत्र मार्ग चोखाळला आहे. आता तर या आघाडीच्या बैठकीचा विषयही कोणी काढताना दिसत नाही. आम आदमी पक्षाने पंजाब आणि दिल्लीत सर्व जागा लढविण्याचा निर्णय जाहीरही करून टाकला. या आघाडीचे एक प्रमुख नेते नितीशकुमार हे तर काँग्रेस-राजदची साथ सोडून, ‘रालोआ’त दाखलही झाले आहेत. इतकेच नव्हे, तर सोमवारी त्यांनी बिहार विधानसभेत भाजपच्या मदतीने आपले बहुमतही सिद्ध केले.

देशाच्या विकासाबाबत कोणत्याही दूरदृष्टीचा अभाव, सामान्य जनतेचे भले करण्याच्या तळमळीचा अभाव, देशप्रेमाची वानवा आणि वैयक्तिक आर्थिक लाभांसाठी सत्तालालसा ही काँग्रेसची व्यवच्छेदक लक्षणे. जनतेच्या पैशावर डल्ला मारून, आपले खिसे भरण्यासाठी काँग्रेसला सदैव सत्ता हाती हवी असते. पण, सामान्य माणसाचे हित आणि भारताला शक्तिमान, विकसित करण्याच्या इच्छेच्या अभावी काँग्रेसला आता सत्ता मिळविणे अवघड जात आहे. आजवर भाषा, धर्म, प्रांत वगैरे विविध विषयांवरून मतदारांमध्ये फूट पाडण्याचे, काँग्रेसचे हे फोडाफोडीचे धोरण बर्‍यापैकी यशस्वी झाल्यामुळेच दीर्घकाळ हा पक्ष सत्तेवर राहू शकला. पण, काळ बदलत असतो, हे काँग्रेसने लक्षातच घेतले नाही. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सामान्य माणसाच्या हाती समाजमाध्यमासारखे हत्यार लाभल्याने, काँग्रेसचे पितळ उघडे पडले. सामान्य वर्गातील माणसाच्या हातीही मोबाईल फोन आणि त्याद्वारे इंटरनेट लागल्याने आपल्या भोवतालच्या वस्तुस्थितीचे भान त्याला आले. काँग्रेसचे खरे स्वरूप मतदाराच्या लक्षात येताच, त्याने काँग्रेसचे हे जोखड मानेवरून फेकून दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच मध्य प्रदेशातील झाबुआ या आदिवासी जिल्ह्याचा दौरा केला. झाबुआसारख्या मागास भागातही जनतेत झालेल्या जागृतीमुळेच नुकत्याच पार पडलेल्या, विधानसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश लाभले. त्याबद्दल आदिवासी मतदारांचे आभार मानताना, पंतप्रधानांनी काँग्रेसच्या लूट आणि फूट या धोरणावर टीका केली. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मतदारांमध्ये फूट निर्माण करण्याच्या धोरणामुळेच काँग्रेस सत्ता राखत आली होती आणि सत्तेचा दुरूपयोग करून सामान्य माणसाला लुटत राहिली. या धोरणामुळेच मध्य प्रदेश आणि इतरही काही राज्ये ही ‘बिमारू राज्ये’ म्हणून ओळखली जाऊ लागली, असे सांगून मोदी यांनी सांगितले की, भाजप सत्तेवर आल्यानंतर, भाजप सरकारांनी केलेल्या वेगवान विकासकामांमुळे राज्याचा चेहरामोहरा बदलला आणि जनतेचे राहणीमानही सुधारले. या बदलाचे कारण केंद्र आणि राज्यात असलेले भाजपचे सरकार असल्याचे मतदारांच्या लक्षात आल्यानेच, त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव केला. ही जागृती मध्य प्रदेशाप्रमाणेच देशाच्या इतरही राज्यांमध्ये झाली आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित रालोआ ४०० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवील, याची जाणीव आता विरोधी पक्षांनाही झाली आहे, असे मोदी यांनी सांगितले.

अर्थात उघडपणे मान्य करीत नसले, तरी काँग्रेसच्या नेतृत्वालाही या वस्तुस्थितीचे भान आले आहे. म्हणूनच माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कर्नाटक किंवा हिमाचल प्रदेशातून राज्यसभेवर पाठविण्याचा विचार सुरू झाला आहे. कारण, उत्तर प्रदेशात येत्या लोकसभा निवडणुकीत रायबरेलीमध्येही मतदार भाजपलाच विजयी करील, याची खात्री काँग्रेसला वाटत आहे. पण, निवडणुकीपर्यंत धीर धरणे भागच असल्याने, आपलाच पक्ष ४०० जागांवर विजय प्राप्त करील, असे धक्कादायक विधान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे. नुकतेच राज्यसभेत आणि पंजाबातील लुधियाना येथे बोलताना, खर्गे यांनी काँग्रेस स्वबळावर ४०० जागांवर विजय मिळवू, असेही ठोकून दिले. त्यांच्या या विधानावर काँग्रेसच्याच नेत्यांचा विश्वास बसत नाही, हा भाग वेगळा. पण, मतदार आता पूर्वीसारखा भोळा राहिलेला नाही, हे खर्गे विसरलेले दिसतात. मतदारांमध्ये फूट टाकण्याच्या प्रयत्नात काँग्रेसच्या आघाडीतच फूट पडत चालली आहे. पंजाबात सत्तारूढ असलेल्या, आम आदमी पक्षाने त्या राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढण्याचे तर जाहीर केले आहेच; पण दिल्लीतील सर्व सात जागांवरही आपले उमेदवार उभे करण्याचा इरादा व्यक्त केला आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू यांसारख्या ज्या राज्यांमध्ये स्थानिक पक्ष शक्तिशाली आहेत, त्या पक्षांनीही काँग्रेससाठी जागा सोडण्यास नकार दिला आहे.

देशातील अन्य घराणेशाहीवादी पक्षांनी काँग्रेसचाच आदर्श ठेवल्याने, त्या पक्षांची धोरणेही काँग्रेसचाच कित्ता गिरविणारी होती. परिणामी, त्यांच्या पुढेही आता काँग्रेससारखेच पक्ष लयाचे संकट उभे राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याचा तडाखा बसला असून, हा पक्ष फुटला आहे. तीच गत शिवसेनेची झाली आहे. आंध्र प्रदेशातही मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या बहिणीनेच या पक्षात फूट पाडून, आपला गट काँग्रेसमध्ये विलीन केला आहे. हीच वेळ आज ना उद्या अन्य घराणेशाहीवादी पक्षांवरही येणार येणार आहे; पण काळ आणि भारत बदलला आहे, हे जेव्हा त्यांच्या लक्षात येईल, तेव्हा फार उशीर झालेला असेल.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.