विकसित भारताच्या संकल्पाला सर्व स्तरातून साथ : चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रतिपादन

कॉंग्रेसचे समीर गायकवाड, शिवसेनेचे अविनाश भोयर यांचा भाजपमध्ये प्रवेश

    12-Feb-2024
Total Views |

Bawankule


नागपूर :
कॉंग्रेस सरकारच्या काळात केवळ मताच्या लांगूलचालनाकरिता विकासाकडे सपशेल दुर्लक्ष केले. यातूनच भ्रष्टाचार फोफावल्याने देशाचा विकास बाधित झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचा संकल्प केला असून त्यांच्या या संकल्पाला सर्वस्तरातून साथ मिळत असल्याचा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. यामुळेच, भाजपात पक्षप्रवेश घेणाऱ्यांची दिवसेंदिवस वाढत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात नागपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. खरबी येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात कॉंग्रेसचे जिल्हा सचिव समीर गायकवाड यांच्यासह जिल्हा कॉंग्रेस ओबीसी सेलचे प्रवक्ते कुणाल वानखेडे, अमर पेलने, स्वाती समर्थ, सुनीता झाडे, तुषार चांभारे यांच्यासह सुमारे ७०० हून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. समिर गायकवाड यांनी खरबी जि.प. क्षेत्रातून निवडणूक लढविली होती. ५०० मतांना भाजपच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला होता.
 
शिल्लक सेनेचा गट फुटला!
 
कोराडी ग्रामपंचायत सदस्य तथा उबाठा गटाचे कामठी उपतालुका प्रमुख अविनाश भोयर, पांजरा शाखाप्रमुख प्रवीण निंबाळकर, कोराडी जि.प. संघटक विक्की नामदेव, सुधीर भोयर, शुभम दीक्षित, आकाश शाहू, अभिषेक चौधरी, सचिन झंजाळ, अनमोल मेश्राम, आकाश जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने उबाठा गटाच्या असंख्य युवा कार्यकर्त्यांचा समावेश आहे. उबाठा गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
 
ज्येष्ठ कार्यकर्त्यांनाही मोदींवरच विश्वास
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गरीब कल्याणाच्या योजनांनी प्रभावित झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी बावनकुळे यांच्या कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी व नयाकुंडचे सरपंच सुधीर अवस्थी यांच्या नेतृत्त्वात नयाकुंड तसेच आसपासच्या गावातील माजी सरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजयुमोचे विलास महल्ले उपस्थित होते. महादुला येथील नवयुग बाजार चौकात युवा कार्यकर्ते बाबू शनीचरा, अंकित गोंडाने, आकाश डुमणे, सागर पतींगराव, अविनाश भोवते यांच्यासह सुमारे २०० हून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.