"नेत्यांचं ऐकून घेत नाहीत! पाणउतारा केला जातो!" बड्या काँग्रेस नेत्यानं केला खुलासा
12 Feb 2024 15:54:42
मुंबई : मुंबई काँग्रेसमध्ये प्रचंड तक्रारी आहेत. आमचा पाणउतारा केला जातो, आम्हाला तुच्छ वागणूक दिली जाते असं अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, असा खुलासा काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
भाई जगताप म्हणाले की, "मुंबई काँग्रेसमध्ये प्रचंड तक्रारी आहेत. अनेक कार्यकर्ते मला पत्र पाठवत आहेत. मी त्यांना हेच सांगितलं की, तुम्ही वर्षा गायकवाडांना जाऊन भेटा आणि चर्चा करा. पंरतू, आमचा पाणउतारा केला जातो, आम्हाला तुच्छ वागणूक दिली जाते अशी त्यांचं म्हणणं आहे. मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून कार्यकर्त्यांना योग्य वागणूक दिली जात नाही. त्यामुळे मुंबई काँग्रेसचा माजी अध्यक्ष म्हणून माझ्या मनाला प्रचंड काळजी आणि चिंता वाटत आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "शंकरराव चव्हाण आणि अशोकराव चव्हाण या दोन दोन पिढ्यांनी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलं आहे. त्यामुळे अचानक असं काहीतरी घडणं हे पक्षाच्या दृष्टीने चांगलं नाही. खरंतर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने याबाबत आधीच विचार करायला हवा होता. आज मुंबईतल्या आमच्या दोन नगरसेवकांनी राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. आतापर्यंत जवळपास ८ ते ९ मुंबईतील नगरसेवक पक्ष सोडून गेले आहेत. कार्यकर्त्याची एका विचाराशी बांधिलकी असते. तो त्या पक्षाशी जोडलेला असतो. तो काही कुणाचा नोकर नसतो," असे म्हणत त्यांनी सध्याच्या घडामोडीवर चिंता व्यक्त केली.