मोदी सरकारच्या कुटनितीस यश, ७ माजी नौसैनिक मायदेश परतले

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच आमची सुटका – नौसैनिकांची भावना

    12-Feb-2024
Total Views |
7 Jailed Navy Veterans Return From Qatar In Big Diplomatic Win For India


नवी दिल्ली:
कतारमध्ये अनेक महिन्यांच्या वेदनादायक बंदिवासानंतर सुटका करण्यात आलेल्या आठ माजी भारतीय नौसैनिकांपैकी सातजण आज मायदेशी परतले आहेत. कथित हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या या माजी नौसैनिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच त्यांची सुटका झाल्याची भावना व्यक्त केली आहे.

भारताने आणखी एक मोठा राजनैतिक विजय मिळवला आहे. कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी सैनिकांची दोहा येथील न्यायालयाने सुटका केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे की, आठपैकी सात भारतीय नागरिकही भारतात परतले आहेत. परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले की, भारतीय नागरिकांची सुटका करण्याविषयी कतार सरकार आणि अमीर यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. सात भारतीय नागरिक मायदेशी परत आले असून आठव्या भारतीय नागरिकासही लवकरच भारतात परत आणले जाईल. या सर्व प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जातीने लक्ष ठेवून होते, असेही क्वात्रा म्हणाले आहेत.

यापूर्वी भारताच्या राजनैतिक हस्तक्षेपानंतर आठ माजी नौसेनिकांना फाशीची शिक्षा तुरुंगात बदलण्यात आली होती. दोहास्थित अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीजमध्ये काम करणाऱ्या आठ माजी भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी २८ डिसेंबर रोजी कतारच्या अपील न्यायालयाने दिलासा दिला होता. त्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये न्यायालयाने त्याला दिलेली फाशीची शिक्षा कमी करून त्यांना ला तीन वर्षापासून ते 25 वर्षांपर्यंत वेगवेगळ्या कालावधीसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारसोबत अतिशय खुबीने संवाद साधून भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणले आहे.

पंतप्रधान मोदी नसते तर आमची सुटका झालीच नसती

मायदेशी परतल्यानंतर सातही माजी नौसैनिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि सरकारच्या कुटनितीचे कौतुक केले. ते म्हणाले, आम्ही मायदेशी परतण्यासाठी सुमारे 18 महिने वाट पाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत. त्यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपाशिवाय आणि कतारसोबतच्या त्यांच्या घनिष्ठ संबंध असल्याशिवाय हे शक्य झाले नसते. भारत सरकारने केलेल्या प्रत्येक प्रयत्नासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. त्यांच्या प्रयत्नाशिवाय आम्हाला हा दिवस पाहणे शक्य झाले नसते, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.