हल्दवानी दंगलीचा मास्टरमाईंड 'अब्दुल मलिक' पोलिसांच्या ताब्यात

    11-Feb-2024
Total Views |
 Haldwani Riots
 
डेहराडून : उत्तराखंडमधील हल्दवानी येथील दंगलीचा मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक याला अटक करण्यात आली आहे. परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा आता दंगलखोरांना पकडण्यात गुंतल्या आहेत. बनभूलपुरा येथे ५ दंगलखोरांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये समाजवादी पक्षाच्या एका नेत्याचा भाऊ, दोन नगरसेवक आणि एका खाण व्यावसायिकाचा समावेश आहे. या हिंसाचाराच्या मुख्य सूत्रधारांपैकी अब्दुल मलिकचे नाव समोर आले असून त्याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.
 
हिंसाचारानंतर अब्दुल मलिक फरार झाला होता. ७५ हून अधिक जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. हिंसाचारात आघाडीवर असलेल्या महिलांचीही ओळख पटवली जात आहे. आतापर्यंत ५००० अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जावेद सिद्दीकीचा भाऊ अब्दुल मतीन हा उत्तराखंड राज्य सपाचा प्रभारी आहे. लाइन क्रमांक १६ नगरसेवक मेहबूब आलम आणि लाइन क्रमांक १४ नगरसेवक झीशान परवेझ, इंद्रनगरचा रहिवासी आहे. यांच्यासह आणखी दोघांना पोलिस कोठडीत घेण्यात आले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
 
अब्दुल मलिक यांनीच अवैध धंदे करून मलिक बगीचा बांधून घेतला होता, तिथे असलेले बेकायदा मशीद-मदरसा पाडण्यासाठी प्रशासन आले तेव्हा हिंसाचार उसळला. या कारवाईला अब्दुल मलिक यांचा सर्वाधिक विरोध होता, असं सांगितलं जात आहे. फरार अब्दुल मलिकला पकडण्यासाठी पोलीस छापे टाकत होते, त्यात त्यांना आता यश आले आहे.
 
मलिकवर सरकारी कामात अडथळा आणणे, जमीन बळकावणे, लोकांना भडकावणे, कट रचणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनीच बेकायदा मदरसा आणि नमाजची जागा बांधली. ८ महिन्यांपूर्वीही महापालिकेने मलिक का बगीचा नावाच्या ठिकाणी बेकायदा बांधकामे पाडली होती. इथे छोटे प्लॉट बनवून विकले गेले, बेकायदेशिररित्या घरे बांधली गेली आहेत.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.