वारकरी शिक्षण संस्थेसाठी ५ कोटींचा निधी देणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    11-Feb-2024
Total Views |

Devendra Fadanvis


पुणे : वारकरी शिक्षण संस्थेतील सुमारे ५०० विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेकरीता ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ या विद्यार्थी वसतीगृहाचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
 
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "वारकरी शिक्षण संस्थेचे कार्य बघून मनाला समाधान होते. मानव समाजाला प्रेरणा देणाऱ्या भागवत धर्माची पताका फडकत ठेवण्याचे काम वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होत आहे. संस्थेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून भारतीय सांस्कृतिक विचार लाखो लोकांपर्यंत पेाहोचविण्यात येतो. संस्थेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि आपला विचार जनसामान्यांपर्यंत पेाहोचविण्याचे कार्य केले जाते."
 
"सर्व प्रकारच्या वेदांना मुठमाती देत ‘विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम, अमंगळ’ हा ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचा विचार या संस्थेने दिला आहे. संस्थेला १०० वर्षांची परंपरा असून ती वृद्धींगत करण्याचे कार्य होत आहे. अधिक विद्यार्थ्यांची सोय झाल्यास समाजप्रबोधनासाठी अधिक विद्यार्थी मिळणार असल्याने शासनातर्फे संस्थेला आर्थिक सहकार्य करण्यात येईल," असेही त्यांनी सांगितले.
 
यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काळाराम मंदीर, नाशिक दौऱ्यावर असतांना वारकरी शिक्षण संस्थचे विद्यार्थ्यांसोबत भजन साधना केली. त्या विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, ह.भ.प. मारोतीबाबा कुरेकर, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपान महाराज शिंदे, संजय महाराज पाचपोळ, संतोष महाराज सुले पाटील, भालचंद्र नलावडे, तुषार भोसले, माजी आमदार योगेश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रावबहादूर पाटील आदी उपस्थित होते.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.