डोंबिवलीची नवउद्योजिका...

    11-Feb-2024
Total Views |
Article on Gautami Bedarkar

मराठी माणसाने व्यवसायात आले पाहिजे, हाच ध्यास घेऊन उद्योजकतेत पाऊल ठेवलेल्या, नवउद्योजिका गौतमी विराज बेदरकर यांच्याविषयी...

परभाषिक महाराष्ट्रात येऊन व्यवसाय करतात आणि मराठी माणूस त्यांच्याकडून वस्तू खरेदी करत असतो. हे चित्र बदलण्यासाठी, मराठी माणसाने व्यवसायात आले पाहिजे. हाच ध्यास घेऊन, उद्योजकतेत पाऊल ठेवलेल्या नवउद्योजिका गौतमी विराज बेदरकर यांच्याविषयी...

गौतमीचा जन्म २००० साली डोंबिवलीत झाला. सध्या ती डोंबिवली पश्चिमेतील दीनदयाळ रोड येथे राहते. तिचे शालेय शिक्षण स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णू नगर येथून झाले, तर तिने महाविद्यालयीन शिक्षण के. व्ही. पेंढरकरमधून घेतले. तिने ’बीए’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. गौतमी शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धा आणि समूहगान स्पर्धेत सहभाग घेत असे. त्यात अनेकदा तिने पारितोषिकेही पटकाविले आहेत. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच, तिने ग्राफिक डिझायनरचा कोर्स पूर्ण केला होता. गौतमी नववी-दहावीत असतानाच, तिने व्यवसाय करायचा, हे मनाशी पक्के ठरविले होते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०१९ मध्ये तिने व्यवसायात पहिले पाऊल टाकले. सुरुवातीला ग्राफिक डिझायनिंगपासून तिने आपल्या व्यवसायाला सुरुवात केली.

सोशल मीडियावर लागणार्‍या सर्व पोस्ट गौतमी तयार करून देते. तसेच एखाद्याला ’स्टार्ट अप’ सुरू करायचे असेल, तर त्यासाठी सोशल मीडियासंदर्भातील मार्गदर्शनही ती करत असते. एका बाजूला ग्राफिक डिझायनिंग, तर दुसर्‍या बाजूला फोटोग्राफीही गौतमी करत आहे. गौतमीचे वडील विराज हे डोंबिवलीतील एका फॅक्टरीत काम करतात, तर तिची आई स्वाती यादेखील व्यावसायिक आहेत. त्यांचा अत्तर आणि अगरबत्ती बनविण्याचा छोटासा व्यवसाय आहे. गौतमीलाही तिच्या आईकडूनच उद्योजकतेत येण्याची प्रेरणा मिळाली. गौतमीच्या उद्योजक होण्याच्या स्वप्नाला तिच्या आई-वडिलांनी पाठबळ दिले. त्यामुळेच उद्योजकतेत गौतमी भक्कम पाय रोवू शकली.

गौतमी दोन वर्षांपासून फोटोग्राफी व्यवसायात कार्यरत आहे. छोट्या इव्हेंटसाठी ती फोटोग्राफीही करते. त्यासाठी संपूर्ण भारतातून कुठेही तिला ऑर्डर आली, तरी ती त्याठिकाणी जाते. बारशापासून लग्नापर्यंत अशा सर्व इव्हेंटसाठी ती फोटोग्राफी करत आहे. अनेकदा फोटोग्राफीनिमित्त किंवा वैयक्तिक कारणाने गौतमी फिरण्यासाठी जाते. त्या ठिकाणीदेखील ती फोटोग्राफीची आवड जोपासते. गौतमी भूज तसेच एकदा कोकणात गेली होती. त्यावेळी तिने त्या ठिकाणचे सौंदर्य आपल्या कॅमेर्‍यात टिपले आहे. प्रीवेडिंग फोटोशूट आणि लग्नाचे फोटो यासाठी गौतमीकडे एक फोटोग्राफर्सची टीमदेखील आहे. या टीममध्ये गेल्या ३५ वर्षांचा अनुभव असलेल्या फोटोग्राफर्सचा ही समावेश आहे. या अनुभवी टीमच्या माध्यमातून लग्नाची फोटोग्राफी केली जाते.

गौतमीला ब्लॉग रायटिंग, कंटेट रायटिंग करायला आवडते. गौतमी ही एखाद्या कार्यक्रमाविषयी किंवा एखाद्या व्यवसायाविषयी लिहीत असते. तसेच वेगवेगळ्या विषयांवरही तिचे लिखाण सुरू असते. याशिवाय मार्केटिंगची देखील तिला आवड आहे. गौतमी ’डोंबिवली ब्राह्मण उद्योजक’ या बिझनेस नेटवर्किंग ग्रुपची सदस्यादेखील आहे. गौतमीला भविष्यात एखादी जाहिरात एजन्सी काढण्याचा मानस आहे. याशिवाय गौतमीला स्वयंपाकाची आणि संगीत ऐकण्याची आवड आहे. भविष्यात आपले स्वतःचे एखादे स्नॅक्स कॉर्नर काढावे, अशी गौतमीची इच्छा आहे. ’अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’ने महिला दिनानिमित्त गौतमीचे कौतुक केले आहे.

‘डोंबिवली ब्राह्मण बिझनेस नेटवर्किंग ग्रुप’मुळे गौतमीसारख्या नवउद्योजकांना फायदा होत आहे. ”या ग्रुपच्या माध्यमातून अनेकदा व्यवसाय मिळण्यास मदत होते. या ग्रुपमध्ये एकूण १०० व्यावसायिक आहेत. त्यांचा एकमेकांशी संवाद होतो. संवादातून एकमेकांना ऑर्डर मिळतात. ’ब्राह्मण बिझनेस नेटवर्किंग ग्रुप’मुळे नवउद्योजकांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात व्यवसाय मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होतो,” असे गौतमी सांगते. गौतमीने देखील व्यवसायात नवीन पाऊल टाकले असले, तरी तिच्या परीने ती सर्वांना मदत करते. गौतमीला सर्वांना मदत करायला आवडते. गौतमी आपल्या परिचयातील उद्योजकांचे व त्यांच्या व्यवसायाशी संबंधित स्टेट्स ठेवते. त्या स्ट्ेटसमधून अनेकदा उद्योजकांना ऑर्डर्स मिळतात. गौतमीचा स्वभाव बोलका असून, तिला लोकांशी संवाद साधायलाही आवडते. त्यामुळे तिला अनेक ऑर्डर मिळतात.

गौतमीने सर्व युवांना उद्योजकतेत यावे, असा संदेश दिला आहे. ”परभाषिक परराज्यांतून महाराष्ट्रात येऊन व्यवसाय करतात आणि आपण महाराष्ट्रीयन त्यांच्याकडून वस्तू खरेदी करतो. त्यापेक्षा मराठी माणसाने व्यवसायात आल्यास, आपण त्यांच्याकडून वस्तू खरेदी करू. यातून मराठी माणसाला ही अर्थार्जनाचे एक चांगले साधन उपलब्ध होईल,” असे गौतमी सांगते. या युवा नवउद्योजिकेला तिच्या पुढील वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरूण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.