रायगड ही पिकनिकची जागा नाही - दिग्पाल लांजेकर

10 Feb 2024 14:35:35

raigad 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : सध्या महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यांवर गिर्यारोहकांचे जाणे वाढले आहेच. पण या सोबतीला सामान्य माणसे देखील गड किल्ले सर करताना दिसत आहेत. परंतु, कुठेतरी शिवरायांच्या गड किल्ल्यांवर आणि प्रामुख्याने स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर लोकं फार चुकीच्या पद्धतीने वावरत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावरच दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘महाएमटीबी’शी बोलताना अशी वागणूक करणाऱ्यांना रायगड ही पिकनिकची जागा नाही असे खडे बोल सुनावले आहेत. दिग्पाल यांनी रायगडावर त्यांच्या आगामी ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाच्या निमित्ताने माध्यम प्रतिनिधींसह रायगडावर गेले होते. 
 
काय म्हणाले दिग्पाल?
 
“रायगड किल्ल्यावर फार जबाबदारीने यायला हवे. ही जागा म्हणजे पिकनिकची जागा नव्हे. इथे आपल्या स्वराज्याचा दरबार भरत असे. छत्रपती शिवाजी महाराज इथे वावरत असतील. त्यामुळे आता जे स्वातंत्र्य किंवा स्वैराचार किल्ल्यांवर जाऊन काही लोकांकडून केला जात आहे तो शिवरायांच्या उपस्थितीत रायगडावर केला जात असेल का? तर नसेल. त्यामुळे या रायगडाविषयी तीच आब, अदब आणि गांभार्य लोकांना असले पाहिजे असे माझे मत आहे. रायगडावर येणाऱ्या प्रत्येकाने इथल्या मातीच्या प्रत्येक कणाकडे पुज्य भावनेने पाहिले पाहिजे. कारण इथे छत्रपती शिवाजी महाराजांची पावले पडली असतील. छत्रपती शंभुराजे वावरले असतील. कधीतरी राजमाता जिजाऊ इथे येऊन गेल्या असतील. त्यामुळे ही पवित्र पावले रायगडाला लागली असल्यामुळे आपण भान ठेवूनच रायगड आणि शिवरायांच्या तर किल्ल्यांवर वावरले पाहिजे”, असे प्रामाणिक मत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी मांडले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0