देवर्षी नारद : रामकथेचा आद्य उद्गाता

    10-Feb-2024
Total Views |
Devarshi Narada and Ramkatha
 
देवर्षी नारद हे अनेकांचे परामर्षदाते, जीवलग, हितैषी, म्हणजे आधुनिक भाषेत ‘फ्रेंड, गाईड, फिलोसॉफर’ होते. ते व्यास, वाल्मिकींच्या गुरुस्थानी होते. त्यामुळे वाल्मिकी कृत ‘रामायण’ व व्यासमहर्षी कृत ‘श्रीमद्भागवत’ या दिव्य काव्यरचना, देवर्षी नारदांच्या प्रेरणा व कृपेचाच महाप्रसाद आहे. महर्षी वाल्मिकींना रामकथेचा प्रथम परिचय देवर्षी नारदांमुळेच होतो. देवर्षी नारदांनी वाल्मिकींना कथन केलेली रामकथा हेच वाल्मिकी रामायणाचे अधिष्ठान आहे. अशा अर्थाने देवर्षी नारद हे रामकथेचे प्रथम उद्गाता आहेत.

धन्य धन्य तो नारदु। ज्यासी सर्वा सर्वत्र गोविंदु।
नारदा तू भगवद्रुप। तुझी भेटी करी निष्पाप।
तुवा कृपा केलिया अल्प। स्वये चित्स्वरूप ठसावे॥


संंत एकनाथांनी देवर्षी नारदांचा ‘नाथ भागवत’ ग्रंथात केलेला गुणगौरव, देवर्षी नारदांंच्या थोरवीचे यथार्थ सम्यक दर्शन आहे. नारदांची विद्वत्ता, व्यासंग, थोरवी लक्षात न घेताच आपल्याकडील चित्रपटांनी त्यांना विनोदी पात्र बनवून, चुकीच्या पद्धतीने सादर केले आहे. वास्तवात देवर्षी नारद हे महर्षी व्यास, वाल्मिकी, भगवान श्रीकृष्णाचे वडील वसुदेव, स्वतः श्रीकृष्ण यांच्यासह अनेकांचे अत्यंत विश्वासू परमार्षदाते जीवलग हितैषी होते. एवढेच नव्हे तर महर्षी वाल्मिकी, महर्षी व्यास, भक्त प्रल्हाद, भक्त ध्रुव यांचे देवर्षी नारद हे गुरू होते. देव आणि दैत्य, सूर-आसूर अशा सर्वांच्याच कुटुंब, परिवारात नारद हे वंदनीय-पूजनीय होते. रावण, हिरण्यकश्यपू या दैत्यांनाही ते आदरणीय, जीवलग वाटत होते. ते केवळ संदेशवाहक नव्हते, तर सर्व हितैषी मध्यस्ती करणारे यशस्वी मध्यस्थ होते.त्यांचे ग्रंथ १) नारद भक्तिसूत्रे २) नारद स्मृती ३) ज्योतिर्नारद ४) नारद पंचरात्र ५) नारद संहिता हे भक्ती, ज्योतिष, संगीत अशा विविध विषयांवरील भक्ती वाङ्मयातील फार मोठा अमृतठेवा आहेत. नारद म्हणजे ज्ञानदाता. (‘नार’ म्हणजे ज्ञान आणि द म्हणजे दाता.) पुराणांमध्ये देवर्षी नारदांचा ‘महात्मा’, ‘महामुनी’, ‘योगभास्कर’,‘योगनीधी’ अशा विशेषणांनी गौरव केलेला आहे. देवर्षी नारद भक्ती क्षेत्रात ‘आचार्य’ मानले जातात.

देवर्षी नारदांच्या भेटीनंतर लुटारू वाल्याचा, तपस्वी वाल्मिकी ऋषी होतो. वाल्मिकींच्या जीवन परिवर्तनास, व्यक्ती उन्नयनास सर्वस्वी नारदांचा सत्संगच मुख्य कारण आहे. ‘माझा उद्धार देवर्षी नारदांमुळे झाला’ असे स्वतः वाल्मिकी ऋषींनीच लिहून ठेवलेले आहे. रामनामाचा जप करण्याचा उपदेश नारद करतात व राम नाम साधनेच्या तपानेच त्यांचे जीवन धन्य होते.उत्तर भारतातील ‘अवध’ परिसरातील ‘तमसा’ नदीकाठी आश्रम बांधून मुनी जीवन व्यतित करत असताना, ऋषी वाल्मिकींच्या आश्रमामध्ये एके दिनी देवर्षी नारद येतात. आगत-स्वागत-सत्कारानंतर वाल्मिकी देवर्षींना प्रश्न करतात की, ‘सांप्रत (वर्तमान) काळात या भूतलावर धर्मज्ञ, वीर्यवान, दृढव्रत, गुणवान असा कोणी पुरुष आहे काय?’ या प्रश्नावर देवर्षी नारद अयोध्यावासी दशरथनंदन रामाचे नाव सांगतात आणि वाल्मिकींचे कुतूहल लक्षात घेऊन, १०० श्लोकांमध्ये रामकथा कथन करतात. तीच रामकथा पुढे ब्रह्मदेवांच्या आदेशानुसार वाल्मिकी सविस्तर लिहितात; तेच ‘वाल्मिकी रामायण’ होय.देवर्षी नारद व वाल्मिकींमधील मूळ संस्कृत संवाद वाचण्यासारखा आहे. ‘को न्वस्मिन् साम्प्रत लोके गुणवान कश्च वीर्यवान ।धर्मश्च कृतश्च सत्यवान्यो दृढव्रतः ॥२॥’ असा प्रश्न वाल्मिकी देवर्षी नारदांना विचारतात. त्यावर नारदमुनी उत्तर देतात की,
 
इक्ष्वाकुवंशप्रभवो रामो नाम जनैः श्रुतः।
नियतात्मा महावीर्यो द्युतिमान् धृतिमान वशी।
बुद्धिमान नीतिमान वाग्मी श्रीमाछत्रुनिबर्हणः।
विपुलांसोे महाबाहुः कम्बुग्रीवो महाहनु॥
महोरस्को महेष्वासो गूढ जत्रुरनिन्दमः।
अजानबाहुः सुशिराः सुललटाः सुविक्रमः॥
धर्मज्ञः सत्यसंधश्च प्रजानां च हिते रतः।
यशस्वी ज्ञानसंपन्नः शुचिर्वश्यः समाधिमान् ॥


या श्लोकांमध्ये देवर्षी नारदांनी रामाचे रूप वर्णन आणि गुणवर्णन म्हणजेच बहिरंग दर्शन आणि अंतरंग गुणवत्ता असे तपशीलवार द्विविध वर्णन केलेले आहे आणि रामाचे हेच गुणवर्णन आजही केले जाते. याच विशेषणांचा वापर पुढे आपणास वाल्मिकी रामायणासह समस्त, सकल राम वर्णनात दिसून येतो. हेच देवर्षी नारदांच्या रामकथेेचे वैशिष्ट्य आहे.श्रीरामांचे रूप वर्णन आणि गुणवर्णन अशा दोन प्रकारे देवर्षी नारदांनी वाल्मिकींना अगदी बारकाईने तपशील दिला आहे. हे सर्व रामाचे वर्णन करणारे श्लोक पूर्णपणे इथे देण्याचे कारण म्हणजे, त्यापुढे निर्माण झालेल्या सकल साहित्यात जे-जे राम वर्णन आढळते, त्या वर्णनाचा हे श्लोक मूळ स्रोत आहेत. देवर्षी नारदकृत या श्रीराम महती वर्णनातील बहुतेक गुणविशेषणे सहज कळणारी आहेत. नियतात्मा म्हणजे ज्याचा देह मन बुद्धीवर म्हणजे स्वतःवर ताबा आहे, असा महापराक्रमी, तरी संयमी, धैर्यवान, अत्यंत बुद्धिमान, नीतिमान, वाग्मी म्हणजे संभाषण चतुर, पराक्रमात एकमेवाद्वितीय, सागरासारखा गंभीर, हिमालयासारखा धैर्यदृढ, कंपित न होणारा, आपत्तीमध्ये निश्चल. या अंतरंग गुणसंपदे समवेतच श्रीराम अत्यंत सुंदर, देखणा आहे, अजानबाहू आहे, तो धर्मज्ञ आहे, सत्यवादी आहे, प्रजेच्या हितासाठी दक्ष आहे, यशस्वी आहे असेही नारद सांगतात.
 
देवर्षी नारदांनी गायलेली रामाची ही महती-थोरवी ऐकून वाल्मिकी थक्क झाले आणि रामाविषयी आणखी काही जाणून घेण्याची इच्छा दर्शविली, तेव्हा नारदमुनी वाल्मिकींना संपूर्ण रामकथा केवळ १०० श्लोकांच्या संक्षेपात ऐकवतात. ही नारद उवाच १०० श्लोकी रामकथा वाल्मिकी रामायणात आपण मूळातूनच पाहू शकतो. जिज्ञासूंनी ती जरूर वाचावी.देवर्षी नारद-वाल्मिकी पूर्वकालात ‘राम’ शब्दाचा उल्लेख वेदवाङ्मयात आहे; पण त्याचा संदर्भ अयोध्येतील रामाशी नाही. चार वेदांपैकी ‘ऋग्वेद’ ग्रंथामध्ये मंडल दहामध्ये दोन वेळा ‘राम’ शब्दाचा उल्लेख आहे. पण, हे ‘राम’ शब्द व्यक्तिवाचक नाहीत. ‘राम’ शब्दाप्रमाणेच वेदामध्ये ‘सीता’, ‘दशरथ’, ‘भरत’ हे शब्दही आढळतात; पण त्यांचा संबंध अयोध्येतील व्यक्तीशी नाही. अयोध्यापती रघुकुलदीपक सीताराम याची सर्व प्रथम कथा देवर्षी नारद वाल्मिकींना सांगतात म्हणून देवर्षी नारद हे रामकथेचे भूतलावरील साहित्यातील पहिले उद्गाता आहेत.
 
-विद्याधर ताठे
(पुढील रविवारी ः आदि महाकवी वाल्मिकींचा ‘राम’)



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.