श्रीरामाशिवाय भारताची कल्पना करणे शक्यच नाही – गृहमंत्री अमित शाह

    10-Feb-2024
Total Views |
amit shah on Shri Ram


नवी दिल्ली: श्रीरामाशिवाय भारताची कल्पनाच करणे शक्य नाही. जे अशी कल्पना करतात, त्यांना भारत कळलेलाच नाही. श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा अर्थात २२ जानेवारीचा दिवस हा भारताच्या भावी पिढ्यांना अनंतकाळ प्रेरणा देत राहणार आहे, असे प्रतिपादन देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी लोकसभेत केले.लोकसभेत नियम १९३ अंतर्गत ऐतिहासिक श्रीराम मंदिराची उभारणी आणि श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा या विषयावर चर्चा झाली. यावेळी विविध पक्षांच्या सदस्यांनी आपले मत मांडले. अखेरिस केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी लोकसभेत आपले मत मांडले. ते म्हणाले, आज आपल्याला या सभागृहात त्यांच्या भावना आणि देशातील जनतेचा आवाज व्यक्त करायचा आहे, जो वर्षानुवर्षे न्यायालयीन कागदपत्रांमध्ये दबला गेला आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अभिव्यक्त झाला. 22 जानेवारी 2024 हा दहा हजार वर्षांचा ऐतिहासिक दिवस असणार आहे.

२२ जानेवारी हा १५२८ मध्ये सुरू झालेल्या अन्यायाविरुद्धच्या लढ्याचा आणि चळवळीच्या समाप्तीचा दिवस आहे. ते म्हणाले की 22 जानेवारी हा संपूर्ण भारताच्या आध्यात्मिक चेतनेचे पुनरुज्जीवन करणाऱ्या प्रभू रामाच्या करोडो भक्तांच्या आकांक्षा आणि पूर्तीचा दिवस आहे महान भारताच्या प्रवासाची सुरुवात आहे. 22 जानेवारी हा दिवस भारतास विश्वगुरू होण्याचा शंखनाद आहे, असे शाह यांनी म्हटले.प्रभू श्रीराम आणि श्रीराम चरित्राशिवाय भारताची कल्पना करता येत नाही आणि ज्यांना हा देश जाणून घ्यायचा आहे आणि अनुभवायचा आहे ते भगवान श्रीरामाशिवाय शक्य नाही. जे प्रभू रामाशिवाय भारताची कल्पना करतात, त्यांना भारत कळलाच नाही आणि ते आमच्या गुलामगिरीच्या युगाचे प्रतिनिधित्व करतात. भगवान श्रीराम हे एक व्यक्ती नसून लाखो लोकांचे आदर्श जीवन जगण्याचे प्रतीक आहेत, म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते. रामराज्य हे कोणत्याही विशिष्ट धर्मासाठी किंवा पंथासाठी नाही, तर ते केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी आदर्श राज्य कसे असावे याचे प्रतीक आहे. प्रभू श्रीराम आणि भगवान रामाच्या चरित्राची पुनर्स्थापना करण्याचे काम पंतप्रधान मोदींनी 22 जानेवारी रोजी केले आहे, असेही शाह यांनी यावेळी नमूद केले आहे.

देशात 2014 ते 2019 पर्यंत रामजन्मभूमीचा लढा सुरूच राहिला, लाखो पानांचे भाषांतर झाले आणि 2019 मध्ये मोदीजी पुन्हा पंतप्रधान झाले, असे अमित शहा म्हणाले. न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधान मोदी यांन 5 ऑगस्ट 2019 रोजी श्रीराम मंदिराची पायाभरणी केली. या आंदोलनात संविधानिक आणि शांततापूर्ण मार्गाने करोडो लोक त्यांच्या इच्छेने आणि भक्तीने अयोध्येत आले. अशोक सिंघल यांनी हा प्रवास शिखरावर नेला, अडवाणीजींनी जनजागृती केली आणि नरेंद्र मोदींनी लोकांच्या आकांक्षा पूर्ण करून आध्यात्मिक चेतना जागृत केली. एका देशाने आपल्या बहुसंख्य समाजाच्या धार्मिक श्रद्धेची पूर्तता करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात इतके दिवस संयमाने कशी बाजू मांडली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ते सौहार्दपूर्ण वातावरणात कसे पार पडले, याचे लोकशाही मूल्य म्हणून या संपूर्ण आंदोलनाकडे पाहिले जाईल, असेही शाह यांनी यावेळी म्हटले आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.